प्रतिनिधी / बेळगाव
अनगोळ येथील ग्रामदेवता श्री कलमेश्वर मंदिरात महाशिवरात्र मोठय़ा उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. महाशिवरात्रीनिमित्त श्री कलमेश्वर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यता आली होती. गुरूवारी पहाटे मंदिराचे पुजारी तसेच शिवभक्तांच्या उपस्थितीत शिवपिंडीची मंत्रोच्चारच्या जयघोषात पूजा करण्यात आली.
पेंडीला दूध, तूप, दही, पाणी, चंदनाचा लेप तसेच पंचामृतांनी शिवपींडीवर अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर मंदिरामध्ये संपूर्ण देवदेवतांची विधीवत पूजा करुन उत्सवाला सुरूवात झाली. त्यानंतर दिवसभर गावातील नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी केली. शिवपिंडीची सुरंद आरास करण्यात आली होती.
सायंकाळी देवाची विधीवत पूजा करुन गावची शांतता, सामाजिक बांधिलकी अबाधित रहावी, शेती चांगली पिकावी, आरोग्य चांगले रहावे, जनावरांचे आरोग्यही उत्तम रहावे, कोरोनाचे संकट टळावे म्हणून गाऱहाणे देखील घालण्यात आले. यावेळी मंदिर कमिटीचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.









