शहापूर, वडगावपेक्षा या मार्गावरील जागांचे दर अधिक : निवासी मालमत्ता 4450 रु.तर व्यापारी मालमत्ता 6230 रुपये प्रति चौ.फूट
गंगाधर पाटील / बेळगाव
बेळगाव शहराबरोबरच उपविभागातील जागांचे दरही दिवसेंदिवस वाढतच चालले आहेत. अनगोळ, शहापूर, वडगाव परिसरातील जागांचे दर मागील 13 वर्षांपासून कितीतरी पटीने वाढले आहेत. या सर्व विभागांमध्ये बेळगावपासून अनगोळला जोडणारा मुख्य अनगोळ रोड सर्वाधिक दरांचा ठरला आहे. अनगोळ मुख्य रस्त्याचे दर निवासी मालमत्तांसाठी 4 हजार 450 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांसाठी 6 हजार 230 रुपये निर्धारित करण्यात आले आहेत. शहापूर येथील खडेबाजारपेक्षाही जादा दर अनगोळ रोडला आला असून तेथील भाव वधारले आहेत.
टिळकवाडीला लागूनच अनगोळ असून अनगोळचा विस्तार वाढत चालला आहे. भाग्यनगर, चिदंबरनगर यासह इतर उपनगरांनी अनगोळ वेढले आहे. अनगोळच्या विस्ताराबरोबरच अनगोळला महत्त्व प्राप्त होताना दिसत आहे. 1997 ला मुद्रांक व नोंदणी विभागाने निवासी मालमत्तांचा दर 115.05 प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांचा दर 225.01 प्रति चौ. फूट असा केला होता. त्यानंतर 2007 मध्ये यात वाढ करून निवासी मालमत्तांचा दर 580 रुपये प्रति चौरस फूट तर व्यापारी जागांचा दर 680 रुपये प्रति चौ. फूट निश्चित केला होता. आता 2020 मध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. मागील 13 वर्षात उच्चांकी दर झाले आहेत. मुद्रांक व नोंदणी खात्याने निश्चित केलेल्या सरकारी दरापेक्षा प्रत्यक्षातील दर गगनाला भिडले आहेत.
शहापूरमध्येही रियल इस्टेट जोरात
शहापूर परिसरात निवासी मालमत्तांचा दर 3 हजार 60 रुपये चौ. फूट तर व्यावसायिक जागांचा दर 4 हजार 284 रुपये चौ. फूट निश्चित करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत वाढलेले दर पाहता शहापूरलाही शहरासारखेच महत्त्व प्राप्त झाले आहे. खडेबाजार, सराफ गल्ली, मीरापूर गल्ली, कचेरी गल्ली या भागातील दर एकसारखे आहेत. शहापूरचा विचार करता 1997 मध्ये निवासी मालमत्तांचा दर 158.03 रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक जागांचा दर 320.06 रुपये प्रति चौ. फूट होता. 2007 साली निवासी मालमत्तांचा दर 590 रुपये प्रति चौ. फूट तर व्यावसायिक 690 रुपये प्रति चौ. फूट झाला. सध्या अनगोळ रस्त्याबरोबरच शहापूर, भाग्यनगर आणि वडगाव येथील निवासी मालमत्तांना आणि व्यावसायिक जागांना चांगले दर मिळत आहेत.
अनगोळला जोडून असलेल्या भाग्यनगरलादेखील महत्त्व आले आहे. अंतर्गत मोठे रस्ते याच बरोबर उच्चभ्रू वसाहती वाढत असल्यामुळे वडगावपेक्षाही भाग्यनगरमधील जागांचे दर मुद्रांक आणि नोंदणी खात्याने अधिक केले आहेत. भाग्यनगरमध्ये निवासी मालमत्तांचे दर 1980 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांसाठी 2772 रुपये प्रति चौ. फूट दर निश्चित केले आहेत.
वडगाव भागालाही विशेष महत्त्व
वडगाव परिसरालाही दिवसेंदिवस महत्त्व येत चालले आहे. बाजार गल्ली, नाझर कॅम्प, सराफ गल्ली यासह शहापूरला जोडणाऱया मुख्य रस्त्याचे रुंदीकरण झाल्यामुळे वडगावलाही महत्त्व येत आहे. वडगावला लागूनच अनेक नगरे तयार झाली आहेत. वडगावचा विस्तार वाढत चालला असून दरही वाढू लागले आहेत. वडगावमध्ये मुद्रांक आणि नोंदणी विभागाने निवासी मालमत्तांचा दर 1 हजार 500 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांचा दर 2 हजार 100 रुपये प्रति चौ. फूट निश्चित केला आहे.
1997 ला वडगाव येथील दर कमी होता. निवासी मालमत्तेसाठी केवळ 100 रुपये प्रति चौ. फूट तर व्यापारी जागांसाठी 230.08 इतका केला होता. 2007 मध्ये या दरात वाढ करून निवासी मालमत्तांसाठी 560 प्रति चौ. फूट तर व्यावसायिक जागांसाठी 660 रुपये प्रति चौ. फूट असा दर होता. त्यामध्ये आता वाढ झाली असून गेल्या 23 वर्षांत तब्बल चार पटीने ही वाढ झाली आहे. मात्र वडगाव, शहापूर पेक्षाही अनगोळ रस्त्याने बाजी मारली आहे.
बेळगाव शहराबरोबरच राज्याच्या महसुलात भर टाकणारी अनगोळ, शहापूर व वडगाव ही उपनगरे महत्त्वाचे केंद्र बनली आहेत. जागतिक पातळीवरील कंपन्यांनी या तिन्ही उपनगर परिसरात आपला विस्तार वाढविला आहे. अनगोळ परिसरातील जमिनी खरेदी करण्याकडेही कल वाढला आहे. वाढीव टक्केवारी आणि ग्राहकांच्या खरेदीबाबतचा कल लक्षात घेऊन आता नव्या दरांनी उच्चांकी मजल गाठली आहे. त्यामुळे या तिन्ही उपनगरांपैकी अनगोळच्या मुख्य रस्त्याचे दर मोठय़ा प्रमाणात असल्याची नोंद सरकारदरबारी पाहायला मिळते.
वास्तविक खडेबाजार-शहापूर याला अधिक महत्त्व आहे. कारण शहापूरमध्ये सराफ कट्टा होता. सोने-चांदीची खरेदी-विक्री बेळगाव शहरापेक्षा मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी होत होती. सध्यादेखील या ठिकाणी सोन्या-चांदीचे व्यावसायिक मोठय़ा प्रमाणात आहेत. त्यामुळे शहापूरची उलाढाल ही मोठी असली तरी अनगोळ परिसरामध्ये विविध शोरुम, कंपन्या आणि औद्योगिक वसाहत जोडली गेल्याने आताही हे महत्त्व अधिकच वाढले आहे.
हिंदवाडी येथील मालमत्तांचे दर वाढले असून सुभाष मार्केट, डॉ. राधाकृष्ण मार्ग, रानडे कॉलनी यांचे दर वाढले आहेत. निवासी मालमत्ता दर 3050 प्रति चौ. फूट तर व्यावसायिक मालमत्तांचे दर 4 हजार 270 प्रति चौरस फूट निश्चित करण्यात आले आहेत. त्या खालोखाल गुरुदेव रानडे रोडचा दर आहे. या भागात निवासी कारणासाठी जागा खरेदी करण्याचे प्रमाण अधिक आहे. शहरालगतच असला तरी गजबजाटापासून दूर असलेला हा मार्ग असल्याने येथे घरे बांधून स्थायिक होणारे वाढले तसेच अपार्टमेंटची संख्याही वर्षागणिक वाढत चालली आहे.









