महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या डोक्यातली सत्ता अजून उतरलेली दिसत नाही. त्यांच्याकडे होते ते वनखाते एकाकडे आणि अर्थखाते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे गेले आहे. आपला पक्ष आता सत्तेत नाही, आपण आपल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाही हे सगळे सुधीरभाऊ विसरले असावेत. तसे म्हटले तर महाराष्ट्रातील तल्लख बुध्दीच्या नेत्यांमध्ये सुधीरभाऊ गणले जातात. प्रत्येक घटना आणि प्रसंग तारीखवार आणि साखरेत घोळवून घोळवून सांगण्यात ते पटाईत! पण, अलिकडच्या काळात त्यांचे हे साखर घोळणे अपयशी ठरतंय. प्रत्येक वक्तव्यानंतर आपटी खाताहेत. आता सुधीरभाऊ अधीरभाऊ झालेत. कारण, शिवसेनेने प्रस्ताव दिल्यास भाजप आजही सत्तास्थापनेसाठी तयार आहे, असं वक्तव्य त्यांनी नांदेडात केलंय. नांदेडला लग्नाच्या समारंभात अक्षता टाकता टाकता सत्तेच्या बोहल्याने त्यांना खुणावले असावे. तसेही, भाऊंच्या साहाय्यकांनी एखाद्या मंत्र्याप्रमाणे त्यांचा नांदेड दौरा कार्यक्रम घोषित केला होता! त्यांच्या नांदेड आगमनाच्या पूर्वसंध्येला माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी घटनेनुसार सरकार न चालल्यास बाहेर पडण्याचा गौप्यस्फोट केला होता. अशोकरावांच्या या घोषणेने किनवटच्या किन्हाळकरांपेक्षाही जास्त हसू सुधीरभाऊंना फुटले असावे. त्यांनी त्यादृष्टीने वक्तव्यांचा सपाटाच लावला. शिवसेनेने आजही प्रस्ताव दिला तर भाजप सत्ता स्थापन करेल. ‘शिवसेनेला आम्ही सुबहका भुला शाम को घर आया असं समजू… वगैरे वक्तव्ये झाली. या वक्तव्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलथा पालथ होईल, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते उध्दव ठाकरे यांच्याकडे अत्यंत संशयाने बघायला लागतील, घटनाविरोधी कृती म्हणून सुधीरभाऊंच्याप्रमाणेच आता प्रदेशाध्यक्ष नसलेले, अशोकराव तातडीने पाठिंबा काढून घेतील. मग उध्दव ठाकरे सुधीरभाऊंच्याकडे सरकार स्थापनेसाठी धावत येतील असे बहुधा त्यांच्या मनाने घेतले असावे. पण, त्यापैकी झाले काहीच नाही. चंद्रपूरच्या जंगलातील वाघाला मुंबईच्या वाघाने फारसं मनावर घेतलेलं नसल्यानं बहुधा ही डरकाळी यवतमाळावरील चर्चेइतकी राजकीय क्षितीजावरून दूर जाईल अशीच आताची स्थिती आहे. सुधीरभाऊ आणि नाथाभाऊंना कधीकाळी महाराष्ट्र फार गांभिर्याने घ्यायचा. पण, तो काळ संपला. महाराष्ट्राच्या राजकारणातून गोपीनाथ मुंडे आणि नितीन गडकरी दोघांनाही मोदीकृपेने दिल्लीला जावे लागले आणि देवेंद्र राज सुरू झाल्यानंतर दोन्ही भाऊंना ‘जे जे होईल ते ते पहावे’ अशीच भूमिका घ्यावी लागली. नाही म्हणायला अर्थखातं असल्यामुळं घोषणा करायला किंवा वनविकासाचं गाणं गायला भाऊंना फडणविसांच्या बरोबरीनं संधी मिळाली. पण, तावडेंना असलेला मान आणि सुधीरभाऊंची शान या सगळय़ाच बाबी फडणविसांच्यापुढे फिक्या होत्या. या सर्वांना पुन्हा महत्व आलं ते शिवसेना आणि भाजपचं सत्तेसाठी ताणलं तेंव्हाच. तरीही सत्ता आपलीच येणार या भ्रमात सगळेजण होते. भाजपनं मला जाणलं नाही असे ठाकरे म्हणाले ते यामुळेच. त्या काळातील सुधीरभाऊंचे वक्तव्य आठवले तर आजही हसू फुटते. उध्दव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुखांना एका शिवसैनिकालाच मुख्यमंत्री करावे असा शब्द दिला असेल तर त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनाच शिवसैनिक मानावे…. असा अप्रतिम सल्ला भाऊंनी दिला होता. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान सेना-भाजपमध्ये तणाव निर्माण झाला तेव्हा मंत्रालयात वाघाची प्रतिकृती उभी करायची शक्कलही त्यांनीच लढवली होती. त्यासाठी ते मातोश्रीवर वाघाची मुर्ती घेऊन गेले आणि वनमंत्री म्हणून वाघाचं संवर्धन करण्याची आपली जबाबदारी आहे असंही जाहीर केलं. पण, वाघ काही त्यांच्या या साखर घोळणीला भुलला नाही. आता तो ‘सुबह का भुला’ होईल अशी आशा त्यांना वाटत असेल तर त्यांच्या इतका आशावादी व्यक्ती सापडणं खरोखर मुश्किल! पण, माणूस मोठा प्रामाणिक. आपल्या पक्षासाठी शब्द टाकावा, फिरवावा तर सुधीर भाऊंनीच. नांदेडच्या दौऱयात मुंबईतील मातोश्रीपेक्षा दिल्लीतल्या मातोश्री मजबुत झाल्या असं सांगतानाच त्यांनी राज ठाकरे यांच्या मनसेशी मात्र भाजपने युती करण्याची आवश्यकता नाही असंही वक्तव्य केलं. इतकं रोखठोक वक्तव्य करणारे भाऊ अवघ्या सात दिवसांपूर्वी काय बोलले होते? वाचकांनी ते आठवून पाहिलं तर लक्षात येईल की, तेव्हा मनसेने आपला झेंडा यापुढे केवळ भगव्या रंगाचा असेल असे जाहीर केले होते. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे भाजपतर्फे सुधीरभाऊ कॅमेऱयासमोर आले. अत्यंत उत्साहाने त्यांनी पत्रकारांना सांगितले की, मनसेने आपला झेंडा भगवा करून देशहिताचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याशी जुळवून घ्यायला भाजपला कोणतीही अडचण येणार नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस जर सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर भाजप आणि मनसे सत्यासाठी एकत्र का येऊ शकत नाहीत? पण, सत्य आणि सत्तेच्या दरम्यानची लढाई लढण्यापूर्वीच भाऊंचे वक्तव्य बदलले. तेही अवघ्या आठ दिवसात. आता त्यांना राज ठाकरे नको आहेत. त्याऐवजी उध्दव ठाकरे यांचाच सत्तेचा प्रस्ताव हवा आहे. शिवसेना हा भाजपचा नैसर्गिक मित्र आहे याचीही त्यांना आठवण झाली आहे. मनसेला सोबत घ्यायची आवश्यकता नाही आणि मनसेकडून तसा प्रस्तावही आलेला नाही हेही त्यांनी सांगून टाकताना समविचारी पक्षांना सोबत घेण्याची भाजपची भूमिका असल्याचंही ते म्हणतात. आता हा समविचार किंवा समविचारी म्हणजे नेमकं काय? हेही भाऊंनी जाहीर केलेलं बरं. म्हणजे, विचाराने गोंधळलेले किंवा गोंधळ वाढविणारे विचार मांडणारे एकत्र येणार असे समजायचे काय? तर मग अशोकराव चव्हाण किंवा जितेंद्र आव्हाडांपैकी कोणाला भाऊ नवा प्रस्ताव देणार आहेत का? हेही स्पष्ट झालं तर बरं होईल. भाऊंनी भाजप काळात अर्थमंत्री म्हणून सुरू केलेल्या योजना पुढेही चालाव्यात म्हणून चंद्रपूरच्या जिल्हा योजनेसाठी वाढीवनिधी, नक्षलग्रस्त जिल्हय़ांसाठी पाचशे कोटीचा पुढचा निधी अर्थसंकल्पात धरावा ही मागणी नुकतीच केली आहे हे ठीक. पण, अर्थसंकल्प मांडायच्या आधी सत्तेतच जाऊन बसावं असं तरी भाऊंना वाटू लागलं नाही ना? अशी शंका वाटावी इतकी भन्नाट वक्तव्यं त्यांच्याकडून सुरू आहेत. त्यामुळे एखाद्याने अधीरभाऊ म्हणून त्यांना हाक मारली आणि भाऊंकडून त्यालाही सकारात्मक प्रतिसाद दिला गेला तर आश्चर्य वाटण्याचं काहीही कारण नाही!








