बेळगाव / प्रतिनिधी
‘स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनो, खुर्चीवरून उठा आणि शहराचा एकदा तरी फेरफटका मारा…. म्हणजे तुम्हाला बेळगावच्या स्मार्ट सिटीची वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे, हे समजेल…! फक्त एसीमध्ये बसून, टेबलावर बिसलरीच्या बाटल्या ठेवून मीटिंग केल्याने बेळगाव स्मार्ट होणार नाही, तर प्रत्यक्षात काम सुरू असलेल्या ठिकाणी व अपूर्णावस्थेतील कामाच्या ठिकाणी जाऊन फेरफटका मारा म्हणजे तुम्हाला कळेल….’ ही प्रतिक्रिया आहे बेळगावच्या दुचाकीस्वारांची!
स्मार्ट सिटीचा अथवा महानगरपालिकेसह अन्य अधिकारी जेथे राहतात तेथील परिसर हा स्वच्छ असतोच. नसल्यास तेथे लगेच साफसफाई करून घेतली जाते. मात्र, सार्वजनिक ठिकाणची स्वच्छता करण्याकडे महापालिका का दुर्लक्ष करते, हे अद्याप समजेनासे झाले आहे. याबाबत वारंवार नागरिकांनी तक्रार करूनही या गोष्टीकडे कानाडोळा केल्याचे पाहायला मिळत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर सर्वसामान्यांना आरोग्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार, असल्याची चिन्हे दिसत आहेत.
धर्मवीर छत्रपती संभाजी चौक ते संचयनी सर्कलपर्यंत एका बाजूने स्मार्ट सिटीअंतर्गत बसथांबे उभारण्यात आले आहेत. पण येथील बसथांब्यावर अस्वच्छता असल्यामुळे प्रवाशांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. याबाबत ‘तरुण भारत’मध्ये अनेकदा वृत्त देऊनही प्रशासनाने कानाडोळा केल्यामुळे प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
संचयनी सर्कलजवळील रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येथील रस्त्यावर पेव्हर्स व खडी विखुरल्यामुळे वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. रस्त्यावर खडी इतरत्र पसरल्यामुळे वाहनधारक घसरून पडण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांनो, एकदा खुर्चीवरून उठा व शहराला एकदा तरी चार चाकीतून नव्हे तर दुचाकीवरून फेरफटका मारा म्हणजे तुम्हाला शहराची स्मार्ट सिटीकडे होणारी वाटचाल कोणत्या दिशेने चालली आहे, हे समजेल व सर्वसामान्यांचे रस्त्यावरून जाताना कसे हाल होत आहेत, ते प्रत्यक्ष अनुभवायला मिळेल, अशा तीव्र संतापजनक प्रतिक्रिया सर्वसामान्य आता करू लागले आहेत.









