तिलारी मुख्यालयात राहणे अधिकाऱयांना बंधनकारक करण्याची मागणी
गदवर्षी दुर्घटनेवेळी एकही अधिकारी तिलारीत नव्हता
गणपत डांगी / साटेली भेडशी:
गतवर्षी पाटबंधारे विभागाच्या दुर्लक्षाने तिलारी धरणक्षेत्र भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. पावसाळीपूर्व कामे न केल्यानेच ही स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे ‘अधिकारी सावंतवाडीत व समस्या तिलारीत’ अशी अवस्था निर्माण होत आहे. यासाठी तिलारी प्रकल्प अधिकाऱयांना मुख्यालयात राहणे बंधनकारक करण्याची मागणी दोडामार्गवासीयांतून होत आहे. ‘तरुण भारत’मधून पावसाळय़ातील संभाव्य समस्यांबाबत लक्ष वेधूनही अद्यापही अधिकाऱयांनी गांभिर्याने घेतले नाही. त्यामुळे पावसाळय़ातील संकटाची भीती धरणक्षेत्र भागातील लोकांच्या मनात घर करून आहे.
अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व इतर महत्वाचे अधिकारी व कर्मचारी यांना घेऊन संयुक्तरित्या मुख्य धरण व संबंधित विभागाची पाहणी करणे, प्राप्त परिस्थितीत गतवर्षीची उद्भवलेल्या स्थितीचा आढावा घेणे आवश्यक होते. मात्र, अद्यापही याबाबत नियोजन झाले नाही. कर्मचाऱयांना आपत्ती व्यवस्थापन दरम्यान काय करावे?, आपत्ती उद्भवल्यास काय निर्णय घ्यावे?, याबाबतचे प्रशिक्षण देणे, आपत्कालीन स्थिती उद्भवणाऱया नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशिक्षण देणे, स्थानिक आपत्ती निवारण समिती स्थापन करणे, या पूर्वी पूरस्थिती निर्माण झाली त्या ठिकाणी सावधानतेचे फलक लावणे, धरणाची मुख्य दरवाजे सुस्थितीत आहेत का? याची पाहणी करून ते सुरळीत कार्यान्वित होतात का याची ट्रायल घेणे याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे. उपकरणाबाबतच्या दैनंदिन नोंदी रचना अधिकाऱयांकरवी पाहणे धरण सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वाचे आहे. या उपकरणाच्या नोंदी मातीभराव भूकंपरोधक सुस्थितीत आहे काय? याची पाहणी करणे, गॅलरीची सिपेज मोजण्यासाठी गॅलरीत जाऊन पाहणी करणे, ओळंबा तपासणे, माती धरणावरील झाडेझुडपे तोडणे, येथील स्थानिक कार्यालये जिल्हा पातळीवरील कार्यालये ही सीसीटीव्हीशी जोडणे आवश्यक बनले आहे.
धरणाच्या गेटबाबत अनेक प्रश्न उपस्थित
खळग्यातील दगडी धरणातील चार बाय सहा मीटरचे रॅडेल गेट्स आहे. हे खाली-वर जातात. याची पाहणी करणे गरजेचे आहे. गेल्या जून 2019 मध्ये द्वार दुरुस्तीची निविदा निघण्यापूर्वीच सदरचे काम सुरू होते. पूरस्थितीवेळी तत्कालीन पालकमंत्री दीपक केसरकर यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत धरणाच्या गेटवर अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
कर्मचाऱयांना आवश्यक सुविधा पुरवा-महेश लोंढे
तिलारी धरण प्रकल्पात आपत्कालीन स्थितीत जीव धोक्यात घालून काम करणाया कर्मचाऱयांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. यासाठी सक्षम दूरध्वनी, वॉकीटॉकी यंत्रणा, धरण परिसरातील पाच किलोमीटर त्रिज्येत येणाऱया नागरिकांना सावधगिरीकरिता वाजवण्यात येणारा मोठा सायरान कार्यान्वित करण्यात यावा. कर्मचाऱयांना गमबुट, बॅटरी, रेनकोट आदी सुरक्षेसाठी वस्तू पुरवाव्यात, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य महेश लोंढे यांनी केली आहे.
महत्वाचे अधिकारी मुख्यालयात हवे- प्रवीण गवस
पावसाळा हंगामात तिलारी प्रकल्पाच्या महत्वाच्या अधिकाऱयांनी जून ते सप्टेंबर या कालावधीत मुख्यालयात हजर राहणे आवश्यक आहे. आपत्कालीन स्थितीत अधिकारी हे मुख्यालयात न राहता आपली सुरक्षितता म्हणून सावंतवाडी येथे शहरात राहतात. त्यामुळे तिलारीत एखादी दुर्घटना घडल्यास या ठिकाणी जबाबदार असा कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याने अनेक अडचणी निर्माण होतात. गेल्या वर्षी घडलेल्या पूरस्थिती वेळी एकही अधिकारी तिलारीत उपलब्ध नव्हता. त्यामुळे पावसाळा हंगामात अधिकाऱयांना तिलारी मुख्यालयात राहणे बंधनकारक करावे. त्याचबरोबर पूरस्थिती उद्भवल्यास त्यावर उपाययोजना म्हणून आवश्यक साधनसामग्री तिलारीत उपलब्ध करावी, अशी मागणी सरपंच सेवा संघ जिल्हा संघटक प्रवीण गवस यांनी केली आहे.









