न्यूयॉर्क किंवा दुबईमध्ये स्थापन करु शकतात ः ब्लूमबर्गच्या अहवालात माहिती
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आशियातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी लवकरच त्यांच्या मालमत्ता व्यवस्थापनासाठी न्यूयॉर्क किंवा दुबईमध्ये समूह कार्यालय स्थापन करू शकतात. ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, गौतम अदानी यांच्याशी संबंधित लोकांनी ही माहिती दिली आहे.
वृत्तानुसार, अदानी कुटुंबाचा वैयक्तिक निधी या कार्यालयातून गुंतवला जाईल. अदानी समूह या कार्यालयासाठी विशेष समूह कार्यालय व्यवस्थापकांची संपूर्ण टीम नियुक्त करण्याच्या प्रक्रियेत असल्याची माहिती आहे.
सल्लागार व कर तज्ञांशी चर्चा
सूत्रांनी सांगितले की, अदानी सध्या आपल्या सल्लागार आणि कर तज्ञांशी फॅमिली ऑफिस प्लॅनबद्दल बोलत आहेत. तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि संसाधनांच्या उपलब्धतेच्या आधारे कार्यालयाचे स्थान निश्चित करणार आहेत.
ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार, अदानी यांच्या वैयक्तिक संपत्तीत यावर्षी 58 अब्ज डॉलर्स (4.73 लाख कोटी रुपये) वाढ झाली आहे. अदानी यांची एकूण संपत्ती 135 अब्ज डॉलर (11.02 लाख कोटी रुपये) आहे आणि ते जगातील तिसरे श्रीमंत व्यक्ती राहिले आहेत.
मुकेश अंबानीही तयारीत
गेल्या महिन्यात ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, हेज फंड अब्जाधीश रेडॅलिओ आणि गुगलचे सह-संस्थापक सेर्गे ब्रिन यांनी सिंगापूरमध्ये समूह कार्यालय सुरू केले आहे. आशियातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी हेदेखील कौटुंबिक कार्यालय उघडण्यासाठी इच्छुक आहेत, असे कळते.









