प्रतिनिधी/ सातारा
पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास पोवईनाका येथून एका चार वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर सोनगाव हद्दीत बलात्कार करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली होती. या घटनेने शहरात चांगलीच खळबळ उडाली. या बालिकेला उपचारासाठी पुण्याला नेण्यात आले असून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. आता तिची प्रकृती स्थिर असून अद्याप आरोपी मोकाट असून पोलिसांनी तपासाची चपे गतीमान केली आहेत.
पोवईनाका येथे सोमवारी पहाटे रस्त्यालगत आपल्या आईसोबत झोपलेल्या 4 वर्षाच्या बालिकेचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार करण्यात आला. सदर घटनेची माहिती शहर पोलिसांना पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी जावून मुलीला जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पुढील उपचारासाठी तात्काळ पुणे येथील रूग्णालयात नेण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. बालिकेची प्रकृती स्थिर असून पुढील तपासासाठी तिला लवकरच साताऱयात आणण्यात येणार आहे. तिच्याकडून आणखी माहिती मिळेल असे तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घोडके यांनी सांगितले. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. तिच्या कुटुंबियाना कोणावर संशय आहे, यांचा शोध सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक घोडके यांनी सांगितले.








