शहरातील 15 संस्थांना दिली मदत
प्रतिनिधी / बेळगाव
लोकमान्य सामाजिक संस्थेने आजपर्यंत अनेकांना मदतीचा हात दिला आहे. निःस्वार्थ भावनेने सर्वांना मदत करून लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीने आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. या लॉकडाऊनच्या काळात अनेक संघ-संस्था, दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते हे सर्वजण रुग्ण, गरजू नागरिक, रुग्णांचे नातेवाईक, तसेच रस्त्याच्या कडेला वास्तव्य करून असलेल्या नागरिकांना जेवण देऊन मदत करीत आहेत. त्यामुळे या सामाजिक संस्थांना मदत करण्याच्या हेतूने लोकमान्य संस्थेने गेल्या वषीप्रमाणे यावषीदेखील मदतीचा हात दिला आहे. लोकमान्य को-ऑपरेटिव्ह सोसायटीने सामाजिक गरज ओळखून बेळगाव शहरातील वृद्धाश्रम, दिव्यांग, एचआयव्ही बाधित, अनाथाश्रम आणि कोरोना काळात गरजूंना अन्नसेवा देणाऱया 15 हून अधिक संस्थांना खाद्यपदार्थ आणि जीवनावश्यक गोष्टी पुरविल्या आहेत.
यामध्ये शांताई वृद्धाश्रम, करुणालय, आर्ष सेवा केंद्र, म. ए. समितीचे कोरोना विलगीकरण केंद्र, श्रीराम सेना हिंदुस्थान अनगोळ, संत मीरा स्कूल येथे उभारण्यात आलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कोविड सेंटर, युवा सेना समर्थनगर, गणाचारी गल्ली येथील श्रीराम सेनेचे शंकर पाटील, नागनूर स्वामी आश्रम कुडची, आश्रय फाउंडेशन, गंगम्मा चिकुंबी मठ, नंदन मक्कळ धाम, होम फॉर होमलेस, कीयान, वन टच फाउंडेशन आदींचा समावेश होता. या सर्व संस्थांच्या संचालकांनी लोकमान्यने दिलेली मदत स्वीकारली व आभार व्यक्त केले. समाजात आज अनेक संस्था आहेत. या संस्थांचे काम नागरिकांच्या मदतीवर अवलंबून असते. पण सध्या लॉकडाऊनमुळे आर्थिक परिस्थिती बिकट झाल्याने आज प्रत्येक जण गरजू व्यक्तीपर्यंत पोहचू शकत नाही.
अशा परिस्थितीत सर्व संस्थांची गरज ओळखून लोकमान्य संस्था मदतीसाठी धावून आल्याने सर्व सेवाभावी संस्थांनी त्यांचे आभार मानले आणि आपल्या शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी शुक्रवारी शहरातील सेवाभावी संस्थांना धान्य पुरविण्यात आले. लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये लोकमान्यचे संचालक आणि कर्मचारी सहभागी झाले होते.








