दिल्लीतील शेतकरी आंदोलकांच्या नेत्यांचे प्रतिपादन, दिल्लीची नाकेबंदी करण्याची योजना
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारशी चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, पण कोणतीही अट स्वीकारली जाणार नाही, असे प्रतिपादन येथे गेले तीन दिवस आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या नेत्यांनी केले आहे. सरकारनेही विनाअट चर्चेची तयारी दर्शवावी, असे आवाहन त्यांनी केले. केंद्र सरकारनेही अशा चर्चेसाठी सज्ज असल्याचे स्पष्ट केले. तरीही रविवारी कोणताही तोडगा निघू शकला नाही.
गेले तीन दिवस दिल्लीत हजारो शेतकरी ठाण मांडून आहेत. ते प्रामुख्याने पंजाबमधील आहे. देशाच्या अन्य भागांमधूनही काही प्रमाणात शेतकरी या आंदोलनासाठी येथे आले आहेत. केंद्र सरकारने नुकताच कृषी क्षेत्र आणि कृषी उत्पादनांच्या खरेदी-विक्री संबंधात नवा कायदा केला आहे. तथापि, आंदोलक शेतकऱयांचा या कायद्याला विरोध आहे. केंद्र सरकारने आमचे म्हणणे ऐकावे असा त्यांचा आग्रह असून त्यांनी चार मागण्या समोर ठेवल्या आहेत.
बुरारी येथे जाण्यास विरोध
केंद्राने आम्हाला चर्चेला बोलावले आहे. तथापि काही अटी घातल्या आहेत. त्यात एक अट चर्चा बुरारी मैदानात करावी अशी आहे. तथापि, बुरारी मैदान हे खुले कारागृह आहे, असा आरोप क्रांतीकारी किसान संघटनेच्या पंजाब शाखेचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी केला. अशा स्थानी सरकारची चर्चा केली जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी मागण्या मान्य करण्याचा आग्रह धरला.
दिल्लीची नाकेबंदी करण्याचा इशारा
सध्या बहुसंख्य आंदोलक शेतकरी दिल्लीच्या सीमारेषेवर ठाण मांडून आहेत. सरकारने मागण्या मान्य केल्या नाहीत, तर दिल्लीत प्रवेश करण्याचे पाचही रस्ते ठिय्या देऊन बंद करण्यात येतील, असा इशारा त्यांच्या नेत्यांनी दिल्या. तसे झाल्यास दिल्लीची कोंडी होईल, अशी चिंता मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी व्यक्त केली. हे रस्ते मोकळे ठेवण्यासाठी केंद्राने उपाय योजना केली आहे.
शेतकऱयांचा दिल्लीतही संचार
आंदोलक शेतकऱयांपैकी बहुसंख्य सीमारेषेवर आंदोलन करत असले तरी काही शेतकऱयांनी दिल्लीत प्रवेश मिळविण्यात यश मिळवले. तथापि, त्यांना परत पाठविण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली. शेतकरी संघटनांच्या नेत्यांनीही यासंबंधी कोणतीही माहिती देण्यास नकार दिला.
शनिवारी-रविवारी शांतता
शुक्रवारी या आंदोलनाला काही प्रमाणात हिंसक वळण लागले होते. आंदोलनाच वृत्तांकन करणाऱया काही माध्यम प्रतिनिधींवर दगडफेड करण्याचा प्रकार घडला होता. तथापि, पोलिसांनी सौम्य लाठीमार आणि अश्रूधुर यांच्या साहाय्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रसार माध्यमांना त्रास झाल्याबद्दल शेतकरी नेत्यांनी खेद ही व्यक्त केला. मात्र शनिवार आणि रविवारी पूर्ण शांतता होती.
कडाक्याची थंडी, निर्धार कायम
दिल्लीत सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. रात्रीचे तापमान 3 ते 4 अंशापर्यंत पोहत आहे. तरीही या जीवघेण्या हवामानात मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकरी व त्यांच्या नेत्यांनी व्यक्त केला. तर केंद्र सरकारने कोरोना आणि थंडीच्या पार्श्वभूमीवर आंदोलन आवरते घेण्याचे आवाहन केले.
3 डिसेंबरला चर्चा ?
केंद्र सरकारने शेतकरी नेत्यांशी चर्चा करण्यासाठी 3 डिसेंबर हा दिवस ठरवला आहे. तशी सूचना आंदोलक नेत्यांना करण्यात आली. मात्र काही संघटनांच्या नेत्यांचा आग्रह ही चर्चा लवकरात लवकर व्हावी, असा असल्याने पुन्हा वाद निर्माण झाला. तसेच शेतकरी संघटनांमधील काही किरकोळ मतभेदही समोर आले. केंद्र सरकारने अद्याप चर्चा लवकर घेण्याविषयी प्रतिक्रिया दिलेली नाही.
आंदोलन राजकीय नाही
शेतकऱयांचे हे आंदोलन राजकीय आहे असे सरकार मानत नाही, असे प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले आहे. सरकार विनाअट चर्चा करण्यास सज्ज असून शेतकऱयांच्या कोणत्याही शंकांना उत्तरे दिली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले. एकदा चर्चा सुरू झाली की वातावरण निवळून एकमेकांची बाजू समजून घेण्यात यश येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.









