प्रतिनिधी /म्हापसा :
पणजीतील मांडवी नदीवर नव्याने उभारण्यात आलेल्या तसेच अवघ्या दीड वर्षापूर्वी जनतेच्या सेवेसाठी भाजप सरकारकडून कार्यान्वित करण्यात आलेल्या अटल सेतूवर वीज खांबा बसविण्याच्या कामात सुमारे 30 कोटी रुपयांचा मोठा घोटाळा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस संजय बर्डे यांनी म्हापसा येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना दिली. माहिती हक्क आयोगाच्या कार्यालयातून आपण याबाबत माहिती मिळविली असून त्याचे पुरावेही कागदपत्रान्वये पत्रकारांना दाखवून दिले. येथील पुलावर वीज खांब बसविण्याचे कंत्राट दिलेल्या मेसर्स डी.पी. इलेक्ट्रीकल्स या कंपनीला देण्यात आले होते. मात्र ठरल्यानुसार 662 खांबाऐवजी येथील पुलावर कमी संख्येने वीज खांब उभारण्यात आल्याचा आरोप संजय बर्डे यांनी केला आहे.
यावेळी व्यासपीठावर पक्षाचे बलभीम मालवणकर, रितेश मोरे, रियाज शेख उपस्थित होते. 45 कोटी 70 लाखाची याकामासाठी निविदा काढण्यात आली होती मात्र हे काम करीत असताना अंदाजे 30 कोटीचे काम येथे झाले नसल्याचा आरोप बर्डे यांनी केला.
ते म्हणाले, सरकारच्या साधन सुविधा विकास महामंडळाचे तत्त्कालीन अध्यक्ष आजचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच उपाध्यक्ष सिद्धार्थ कुंकळकर यांची याविषयावरून चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी संजय बर्डे यांनी केली. याबाबतीत राष्ट्रवादी पक्षाकडून येत्या एक दोन दिवसात अटल सेतूवर झालेल्या कथीत वीज खांबाच्या घोटाळा व भ्रष्टाचारावरून प्रथम दर्शनी अहवाल पणजीच्या पोलीस स्थानकात दाखल करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी बर्डे यांनी दिले. सध्या राज्यात भाजपचे सरकार असून भाजप सरकारच्या गृहमंत्रालयाकडून याबाबत तक्रार सादर केल्यास त्या तक्रारीत आडकाठी आणल्यास शेवटचा उपाय म्हणून आपण आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशाराही यावेळी संजय बर्डे यांनी सरकारला दिला आहे.
वीज बिलाबाबत जनतेची सरकारकडून दिशाभूल
राज्यातील जनतेच्या वीज बिलांची अर्धी रक्कम सरकारकडून माफ करण्यात येईल असा खोटा प्रचार करून वीज खाते जनतेची उघडपणे सरकार दिशाभूल करत आहे. असे बर्डे म्हणाले. आपण आपले विजेचे बिल म्हापसा वीज खात्यात भरण्यासाठी गेलो असता तसेच कार्यालयातील अभियंत्यांनी तसे आम्ही करू शकत नाही असे सांगितले असल्याचे ते म्हणाले. वीज मंत्री निलेश काब्राल यांनी अर्धी रक्कम सरकार भरेल असे जाहीरपणे सांगितले असले तरी हे सर्व काही जनतेच्या डोळय़ात धूळ घालण्याचा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. हिम्मत असल्यास वीज मंत्र्यांनी म्हापशात येऊन याबाबत आमच्याकडे वीज बिलांचा घोळ स्पष्ट करावा, आम्ही त्यास उत्तर देण्यास सज्ज आहोत, सरकारचा खोटारडेपणा जनतेला आता हळूहळू कळू लागला आहे. वीज मंत्र्यांनी जनतेचा विश्वासघात न करता वीज बिलाबाबत योग्य तो निर्णय घेऊन सामान्य जनतेची पिळवणूक थांबवावी अशी मागणीही यावेळी बर्डे यांनी केली. गुरुवारी सकाळी म्हापशातील इंद्रधनुष्य सभागृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय बर्डे बोलत होते.
चतुर्थीच्या तोंडावर सरकारच्या सामाजिक कल्याण खात्यामार्फत विविध योजनांद्वारे गरजू लोकांना वितरित करण्यात येणारा निधी तात्काळ मंजूर करून लोकांच्या खात्यात जमा करण्याची मागणी शापोरा बोट असोसिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कार्यकर्ते बलभीम मालवणकर यांनी यावेळी केली.









