पंढरपूर / ऑनलाईन टीम
राज्यात कठोर निर्बंध लावण्यात आले आहे अशा स्थितीत पंढरपुरात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सभेत तुफान गर्दी झाली होती. यावेळी करोनासंबंधित नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे आरोप विरोधकांकडून होत आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेसबुक लाईव्ह करत राज्यातील जनतेला निर्बंध पाळत सहकार्य करण्याचे आवाहन केल्यानंतर काही वेळातच ही सभा पार पडली. भाजप नेते चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकार यांनी अजित पवार यांच्या पंढरपुरातीस सभेवर प्रश्न उपस्थित केला आहे.
आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत….
चंद्रकांत पाटील म्हणाले की, एका अर्थाने मोगलाई आली आहे. हम करे सो कायदा. आम्ही कसलेही कायदे पाळणार नाही असं…शरद पवारांनी फेसबुकच्या माध्यमातून सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे असं आवाहन केलं. आम्ही सहकार्य करत आहोतच ना…आमचा प्रचंड विरोध होता पण एका शब्दाने बोललो का. आता अजित पवारांवर कारवाई करा मग…आहे का उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत, असा प्रश्नच त्यांनी उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे.
नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब?
प्रविण दरेकर यांनी देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून अजित पवारांत्या सभेतील गर्दीचा फोटो शेअर करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच एका वृतवहिनीशी बोलताना त्यांनी पोलिसांनी सभेला परवानगी कशी दिली असा प्रश्न देखील सरकारला विचारला आहे. प्रविण दरेकर यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, एकीकडे शरद पवार करोनाचे नियम पाळा म्हणून महाराष्ट्राला आवाहन करतात, तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत पंढरपुरात नियमांची धज्जी उडवली गेली आहे, नियम काय फक्त सर्वसामान्यांना आहेत का पवार साहेब?, अशी विचारणा त्यांनी केली.
अजित पवार आज पंढरपुरात
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीचे महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराच्या निमित्ताने अजित पवार आज पंढरपुरात आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत भाजप नेते कल्याणराव काळे यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. अवघ्या दोन वर्षांतच काळेंनी भाजपला रामराम ठोकला. त्यावरुन “मधल्या काळात आपला ट्रॅक चुकला होता” अशी टोलेबाजीही कल्याणरावांनी केली. पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. सहकार शिरोमणी वसंतराव कारखान्याचे अध्यक्ष असलेले कल्याणराव काळे यांचा पूर्ण गट राष्ट्रवादीच्या भगीरथ भालकेंचा प्रचार करणार आहे.