प्रतिनिधी/ सातारा
सभासद शेतकऱयांच्या ऊस पिकाला उच्चतम दर देऊन त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे स्व. भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न अजिंक्यतारा साखर कारखान्याकडून ख्रया अर्थाने साकार होत आहे. गाळपास आलेल्या उसाचे एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा केले जात आहे. सभासद शेतकऱयांच्या हक्काची संस्था असलेला हा कारखाना पूर्णपणे आर्थिक सक्षम असून कारखाना शेतकरी हित जोपासण्यात नेहमीच अग्रेसर राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. दरम्यान, कारखान्याचा साखर उतायाचा मागील 35 वर्षांचा इतिहास पाहता या गळीत हंगामात मागील सर्व उच्चांक मोडून कारखान्याने 12. 85 टक्के साखर उताऱयाने साखर उत्पादन करून साखर उताऱयात नवीन विक्रम प्राप्त केला, याबाबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याच्या 36 वा गळीत हंगाम आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, चेअरमन सर्जेराव सावंत, व्हा. चेअरमन विश्वास शेडगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक संजीव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पडला. गळीत हंगामाची सांगता आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत शेवटच्या पाच पोत्यांचे पूजन करून झाली. यावेळी ते बोलत होते. यावेळी चेअरमन सावंत , व्हा. चेअरमन शेडगे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक देसाई, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रत्येक गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सभासद, बिगर सभासद, ऊस पुरवठादार शेतकरी, अधिकारी, कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभते. यावेळीही सर्वांचे योगदान लाभले असून कोरोनाच्या महाभयंकर परिस्थितीतही ऊस तोडणी व वाहतूक यंत्रणेतील मुकादम, मजूर यांनी न घाबरता सक्षमपणे काम करून गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी योगदान दिल्याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सर्वांचेच आभार मानले.
या गळीत हंगामात 155 दिवसात 6 लाख 12 हजार 917. 029 मे. टन उसाचे गाळप होऊन विक्रमी 12.85 टक्के साखर उताऱयाने 7 लाख 70 हजार 450 क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. यातील 1 लाख 750 क्विंटल साखर परदेशात निर्यात करण्यात आली तर, बी- हेवी मोलॅसिसपासून 20 लाख लिटर्स इथेनॉल निर्मिती करून भारत पेट्रोलियम व इंडियन ऑइल या कंपन्यांना इथेनॉलचा पुरवठा करण्यात आला आहे. हंगामात सरासरी 158.39 टक्के क्षमतेचा वापर होऊन प्रतिदिन 3990.78 मे. टन सरासरीने ऊस गाळप करण्यात आले.
2019-20 या गाळप हंगामात शासन निर्धारित सूत्रानुसार 2790 रुपये प्रतिटन एफआरपी निघाली असून गाळपास आलेल्या उसाला पहिली उचल म्हणून 2500 रुपये प्रतिटन प्रमाणे पेमेंट वेळेत अदा करण्यात आले आहे. एफआरपीप्रमाणे उर्वरित रक्कम सुद्धा लवकरच अदा करण्यात येईल. यापुढेही सर्वांनीनेहमीसारखे सहकार्य करून संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता ठेवण्यासाठी हातभार लावावा, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.








