ऑनलाईन टीम / पुणे :
अजिंक्य डी वाय पाटील युनिव्हर्सिटीने अलीकडेच डॉ. डी. वाय. पाटील नॉलेज सिटी, चारोळी, पुणे येथे एचआर मीट 2020 चे आयोजन केले होते.
एचआरमीट-2020च्या आयोजनाचे उद्दिष्ट पदवीधरांच्या रोजगार क्षमता वाढवण्यासाठी उद्योगाच्या अपेक्षा समजून घेणे, शिक्षणक्षेत्र तसेच उद्योगातील दरी भरून काढणे, ज्ञान आणि कार्यपद्धतींचा शोध घेणे, त्यात नावीन्यपूर्णता आणणे आणि देवाणघेवाण करणे हे होते. या सत्राचे आयोजन डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस आणि अजिंक्मय डी. वाय. पाटील युनिव्हर्सिटीच्या तिसऱया आणि अंतिम वर्षातील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी करण्यात आले होते.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. झेड. शेख आणि डॉ. अशोक कासनाळे हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात केली. प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी श्रीमती श्वेता शर्मा यांनी मान्यवरांचे स्वागत केले आणि विद्यार्थ्यांना उद्दिष्ट समजावून सांगितले. या एकदिवसीय सत्रात 250 पेक्षा अधिक विद्यार्थी उपस्थित होते. मान्यवर वक्त्यांमध्ये नीरज कर्पे (केपजेमिनी इंडिया), सुनील राजपूत (एसेंचर), उपेंद्र तिवारी (महिंद्र सीआयई ऑटोमोटिव्ह लि.), नितांशा नेहा (लिसा होम्स सोल्यूशन्स लि.), राधिका गौर (हेक्सावेअर टेक्नॉलॉजीज), प्रीती साखरे (टाटा मोटर्स लि.), अमोल नितवे (ईएसडी प्रोग्राम लीड, आरपीजी फाऊंडेशन) यांचा समावेश होता. त्यांनी उगवत्या आणि मागणी असलेल्या तंत्रज्ञानाचे महत्त्व आणि उपयुक्तता जसे आर्टिफिशियल इंटेलिजेन्स, रोबोटिक्स, एनालिटिक्स, मोबिलिटी आणि क्लाऊड यांच्यावर तसेच सध्याच्या बाजारपेठेतील या तंत्रज्ञानामध्ये नोकरीच्या शक्यता आणि नोकरीची प्रक्रिया यांच्याबाबत चर्चा केली.