गुन्हे दाखल करून होणार कारवाई
प्रतिनिधी/ सातारा
अग्नीपथ योजनेच्या विरोधात आज दि. 20 रोजी सातारा येथे आंदोलन होणार असल्याची अफवा पसरवण्यात आली आहे. चलो सातारा अशी पोस्ट तयार करून गेल्या काही दिवसापासून सोशल मिडियावर वायरल करण्यात आली आहे. अशा कोणत्याही आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. यामुळे कोणीही साताऱयात येवून आंदोलन करू नये. अन्यथा गुन्हे दाखल करून अटक करण्यात येईल असे आवाहन शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी केले.
यावेळी पोनि निंबाळकर म्हणाले, केंद्र सरकारच्या अग्नीपथ योजनेला इतर राज्यातून विरोध होत आहे. ही योजना रद्द करावी म्हणून आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अशीच स्थिती साताऱयात निर्माण व्हावी, कायदे सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हावा म्हणून चलो सातारा अशी पोस्ट वायरल करून आज सोमवारी आंदोलनासाठी एकत्र जमण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु अशा कोणत्याही आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिलेली नाही. शहरातील सर्व आर्मी ऍकॅडमी च्या विद्यार्थी, पालक, माजी सैनिक प्रशिक्षण देणाऱया संस्थेचे संचालक या सर्वांना शांतता राखण्याचे आवाहन करत आहे. सर्वांनी ही अफवा आहे हे लक्षात घ्यावे. यासाठी सायबर सेल ला सक्रीय करण्यात आले आहे. अशा पोस्ट शेअर करणाऱयावर पोलीसांचा वॉच आहे.
जमाव बंदीचे आदेश लागू
चलो सातारा या बेकायदेशीर आंदोलनाविरूद्ध जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिह्यात जमाव बंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच जिह्यात नाकाबंदी करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. आंदोलन स्थळी येणाऱया आंदोलनकर्त्यांना जागेवरून अटक करण्यात येणार आहे.








