ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारताने शनिवारी अग्नी प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातील बालासोर येथून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. अग्नी पी क्षेपणास्त्र हे अग्नी मालिकेचे आधुनिक क्षेपणास्त्र आहे. याची मारक क्षमता 1000 ते 2000 किलोमीटरच्या दरम्यान आहे. अग्नी-पी हे बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या अग्नी मालिकेतील सहावे क्षेपणास्त्र आहे. हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवर मारा करते. या अण्वस्त्रसक्षम क्षेपणास्त्राची रचना डीआरडीओने केली आहे.
अलीकडेच भारताने ओडिशातील चंडीपूर येथून ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूझ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली होती. पुढील काही दिवसांत डीआरडीओ आणखी अनेक बॅलिस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्याची शक्यता आहे.









