राहुल गांधींच्या आरोपानंतर लष्कराचे स्पष्टीकरण : गवते यांच्या कुटुंबीयांना योग्य सन्मान निधी देण्याची घोषणा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय लष्करात अग्निवीर म्हणून कार्यरत असलेल्या गवते अक्षय लक्ष्मण यांच्या बलिदानाबद्दल सोशल मीडियावर पसरवल्या जात असलेल्या अफवा पाहता लष्कराने स्पष्ट निवेदन जारी केले आहे. अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांनी सियाचीनमध्ये कर्तव्य बजावत असताना बलिदान दिल्याचे भारतीय लष्कराच्या वतीने सांगण्यात आले आहे. या दु:खाच्या प्रसंगी भारतीय लष्कर शोकाकुल कुटुंबाच्या पाठीशी उभे असून दिवंगत अग्निवीर शिपायाच्या सेवेच्या संबंधित नियमांनुसार आणि अटींद्वारे योग्य देय मानधन नातेवाईकांना अदा केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. सोशल मीडियावर मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना आर्थिक मदत करण्यासंदर्भातील परस्परविरोधी संदेश पाहता हा खुलासा करण्यात आला आहे.
अग्निवीर गवते अक्षय यांच्या बलिदानानंतर सोशल मीडियावर अपप्रचार आणि राजकारण सुरू झाले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या प्रकरणाचा खोटा प्रचार केला. त्यांनी सोशल मीडियावर ‘सियाचीनमध्ये अग्निवीर हुतात्मा झालेल्या अक्षय लक्ष्मणच्या हौतात्म्याचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या मनापासून संवेदना. एक जवान देशासाठी हुतात्मा झाला, सेवेच्या वेळी ना ग्रॅच्युयिटी ना इतर लष्करी सुविधा, हुतात्मा झाल्यावर कुटुंबाला पेन्शनही नाही. अग्निवीर योजना ही भारताच्या वीरांचा अपमान करण्याची योजना आहे.’ असे एका पोस्टद्वारे लिहिले होते. त्यानंतर लष्कराने यासंबंधी योग्य स्पष्टीकरण देत राहुल गांधी यांचे दावे आणि आरोप खोडून काढले आहेत.
लष्कराकडून निवेदन जारी
अग्निवीर योजना सुरू झाल्यापासून त्यावरून राजकारण सुरू आहे. आता सैनिकांच्या बलिदानाच्या नावावर राजकारणही सुरू झाले आहे. यावर, सोशल मीडियावर पसरलेल्या गोंधळाबाबत लष्कराने सांगितले की, कर्तव्यावर असताना प्राणाची आहुती देणाऱ्या अग्निवीरच्या निकटवर्तीयांना 48 लाख रूपये नॉन कॉट्रिब्युटरी इन्शुरन्स, 44 लाख रूपये नुकसान भरपाई म्हणून देण्यात येईल. तसेच अग्निवीरद्वारे प्रदान केलेल्या सेवा निधीपैकी 30 टक्के योगदान आणि त्यावरील व्याजाची जुळवाजुळव सरकारद्वारे केली जाईल. या व्यतिरिक्त, कुटुंबाला मिळणाऱ्या मानधनामध्ये मृत्यूच्या तारखेपासून चार वर्षे पूर्ण होईपर्यंत उर्वरित कार्यकाळातील (13 लाख रुपयांपेक्षा जास्त) रक्कमदेखील समाविष्ट आहे. सशस्त्र सेना युद्ध अपघात निधीतून 8 लाखांचे योगदान दिले जाईल, असे सांगण्यात आले. भारतीय लष्कराने अधिकृत निवेदन जारी करून या अफवेवर परिस्थिती स्पष्ट केली आहे. इतकेच नाही तर, सैन्यात भरती कोणत्याही प्रकारची असो, बलिदानाचा प्रश्न येतो तेव्हा कोणाशीही भेदभाव केला जात नाही, असेही लष्कराने निवेदनात स्पष्टपणे नमूद केले.
राहुल यांचे वक्तव्य बेजबाबदार : भाजप
भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी राहुल गांधींचे वक्तव्य मूर्खपणाचे आणि बेजबाबदार असल्याचे म्हटले आहे. वीरमरण प्राप्त झालेल्या जवानाच्या कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत केली जाईल. त्यामुळे फेक न्यूज पसरवणे थांबवा. जर तुम्ही पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहत असाल तर पंतप्रधानांसारखे वागण्याचा प्रयत्न करा, असे भाजपने ठणकावले आहे.
20 ऑक्टोबरला मुलाशी शेवटचा संपर्क : वडील
अग्निवीर गवते अक्षय लक्ष्मण यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणण्यात येणार आहे. अक्षयचे वडील लक्ष्मण गवते म्हणाले, अक्षय अभ्यासात खूप हुशार होता. त्याने बी.कॉमपर्यंत शिक्षण घेतले होते आणि त्याला सैन्यात भरती व्हायचे होते. 20 तारखेला माझा त्याच्याशी शेवटचा संवाद झाला. मग त्याने माझ्या आणि आईच्या तब्येतीची विचारपूस केली, असे त्यांनी सांगितले.









