अमृत योजनेच्या पाईपलाईनचे लिकेज सापडले नागरिकांतून समाधान
प्रतिनिधी / मिरज
तब्बल आठ दिवसांपासून ड्रेनेज मिश्रीत गढूळ पाण्याचा पुरवठा सुरू असलेल्या अमृत योजनेचा ‘फॉल्ट’ अखेर सापडला. रात्री उशिराने शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. मात्र, हा फॉल्ट शोधण्यासाठी संपूर्ण रेवणी गल्लीची चाळण झाली आहे. या परिसरातील एक पाईप बदलण्यात आली आहे. आता शुध्द पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
गेल्या आठ दिवसांपासून किल्ला भाग, रेवणी गल्ली, कोकणे, गल्ली, गाडवे चौक आणि बालगंधर्व नाटय़गृह परिसरात ड्रेनेज मिश्रीत, गढूळ आणि दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा सुरू होता. वारंवार तक्रारी करुनही महापालिका प्रशासन, नगरसेवक आणि ठेकेदार दुर्लक्ष करीत होते. अखेर तरुण भारतने या प्रश्नावर आवाज उठविल्यानंतर हडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने युध्द पातळीवर लिकेज पाईप शोधण्यास सुरूवात केली होती. रविवारी दिवसभर या पाईपचा शोध सुरूच होता. यासाठी संपूर्ण रेवणी गल्ली परिसरात पोकलँडद्वारे 22 खड्डे पाडण्यात आले होते.
रेवणी गल्लीतील हुसेनबाशा चौकाच्या पाठीमागे असणाऱया एका ड्रेनेजवळ सदरची पाईप लिकेज झाली होती. अगदी ड्रेनेजला लागूनच ही पाईप टाकल्याने ड्रेनेच्या पाण्याचा थेट अमृत योजनेच्या पाईपलाईनमध्ये शिरकाव होत होता. तसेच याच परिसरातच असणाऱया एका लहान बोळात जुन्याच पाईपलाईनमधून अमृत योजनेचे पाणी सोडण्यात आल्याने तेथूनही गढूळ पाणी येत होते. दिवसभराच्या परिश्रमानंतर हे दोन्ही फॉल्ट सापडले. कर्मचाऱयांनी काहीकाळ पाणी पुरवठा बंद ठेवून युध्द पातळीवर पाईप बदलण्याचे काम केले. ड्रेनेजजवळ लिकेज झालेली पाईपही तात्काळ बदलण्यात आली.
शनिवारी रात्री उशिराने शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू झाला. त्यानंतर महापालिका कर्मचाऱयांनी प्रत्येक घरातील पाण्याचा नमुना तपासून पाणी शुध्द येत असल्याची खात्री केली. सुरूवातीलाही गढूळ पाणी येत असल्याने काहीकाळ नळ सुरू करुन ठेवण्याचा सल्ला दिला.
रविवारी सकाळपासून पूर्णतः शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू झाला आहे. त्यानंतर कर्मचाऱयांनी उखडलेले खड्डे केवळ माती टाकून तात्पूरत्या स्वरुपात मुजविण्यात आले. दरम्यान, आठ दिवस गढून पाण्याचा सामना करावा लागलेल्या नागरिकांनी शुध्द पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर समाधान व्यक्त केले. ‘तरुण भारत’ने प्रसिध्द केलेल्या सविस्तर वृत्तामुळे काम मार्गी लागल्याची भावना व्यक्त करीत नागरिकांनी कौतुक केले.








