-उमेदने घेतली होती निराधार आजीचे पालनपोषण करण्याची जबाबदारी
प्रतिनिधी/ वाकरे
दुर्गम मालाई धनगरवाड्यावर त्यांचे वास्तव्य..कोणीही जवळचे नातेवाईक नाहीत..आजारपणामुळे इतरांचे दुर्लक्ष… मात्र उमेद सेवा परिवाराच्या कार्यकर्त्यांच्या निदर्शनास ही बाब आली… गेली दोन वर्षे त्यांनी आजीचे पालकत्व स्वीकारले…मात्र आज या निराधार आजीने जगाचा निरोप घेतला आणि उमेद परिवारात दुःखाची छाया पसरली. सखुबाई येडगे ( वय ८०) असे या मृत आजीचे नाव.
दोन वर्षापूर्वी मालाई धनगरवाडा येथील सखुबाई येडगे यांच्या पायाला जखमा होऊन त्यांच्या पायात जंतू झाल्याचे उमेदचे प्रमुख प्रकाश गाताडे यांना समजले. त्यांनी तातडीने तेथे धाव घेऊन त्यांच्यावर डॉक्टरांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने उपचार सुरू केले. आजीच्या पायाची जखम बरी होऊन त्यांच्या तब्येतीत सुधारणा झाली. दरम्यान त्यांच्या घराची दुर्दशा झाल्याने उमेदच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराची दुरुस्ती आणि रंगरंगोटी केली. घरात वीज नसल्याने उमेदने सौरदिवा उपलब्ध करून दिल्याने त्यांच्या घरात पहिल्यांदा प्रकाश पहायला मिळाला. तर, त्यांना लागणाऱ्या धान्य आणि उपजीविकेच्या बाबी उपलब्ध करुन देऊन त्यांचे जगणे सुसह्य केले. खऱ्या अर्थाने गेल्या दोन वर्षात आजीच्या जगण्याला उमेद परिवाराने उमेद दिली.
मात्र गेल्या पंधरा दिवसांत आजीची तब्येत खालावली. त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या होत्या, तर पडल्यामुळे हात दुखावलेला होता. त्यामुळे त्यांची तब्येत कृश झाली होती. हे सर्व दृश्य पाहून उमेदच्या कार्यकर्त्याचे मन हेलावून गेले. उमेद सदस्य डॉ.बालाजी पाटील, पायलट रवी, दशरथ आयरे, अमोल काळे, अनिल कांबळे यांच्या १०८ टीमला बोलावून या आजीवर उपचार सुरू केले आणि सर्वांच्या साथीने त्यांना आजारातून बरे करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र आज उमेद सेवा परिवाराची या निराधार आजीला बरे करण्याची धडपड अयशस्वी ठरली आणि तिने या जगाचा निरोप घेतला. ग्रामस्थ,लांबचे नातेवाईक आणि उमेद कार्यकर्त्यांनी तिचे अंत्यसंस्कार केले.
या आजीला गेल्या दोन वर्षात तौसिफ पटेल ,संदीप गिरवले, दिनेश कांबळे, डॉ झुंजार माने , डॉ बालाजी पाटील, डॉ.शुभम गवंडी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.निरंकारी, मांजरे प्राथमिक आरोग्य केंद्र, गटविकास अधिकारी अनिल वाघमोडे , दशरथ आयरे, अमोल काळे, अनिल कांबळे, नितीन जगताप , प्रकाश गाताडे, राहुल कदम या सर्वांचे सहकार्य लाभले.










