पहिला मोर्ले-सत्तरी येथील 85 वर्षांचा वृद्ध : अस्थमा, मधुमेहाने चार वर्षांपासून बेडवर : दुसरा खारीवाडा-वास्को येथील 60 वर्षीय
प्रतिनिधी / मडगाव
कोरोनाचा संसर्ग झाल्याने मोर्ले-सत्तरी येथील 85 वर्षीय वृद्ध व्यक्तीला काल सोमवारी पहाटे 5.45 वाजण्याच्या दरम्यान मडगावातील कोविड हॉस्पिटलात मृत्यू आला. या बातमीने दिवसभर राज्यात भीतीचे वातावरण वाढले होते. गोव्यातील हा पहिला कोविड बळी ठरला असतानाच रात्री उशिरा कोरोनाचा आणखी एक बळी गेल्याचे वृत्त आले. खारीवाडा-वास्को येथील हा रुग्ण 60 हून अधिक वर्षीय, तसेच त्याला ह्य्दयविकाराचा आजार होता. राज्यात एकाच दिवशी दोन बळी गेल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. मृत व्यक्तींवर प्रोटोकॉलनुसार सरकारच्या वतीने अंत्यसंस्कार केले जातील. मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द केले जाणार नाहीत.
दरम्यान, कोविड हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या अन्य एका 80 वर्षीय महिलेची प्रकृती गंभीर असून तिला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. या महिलेसह कोविड हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात आता दोघांवर उपचार सुरू आहेत. सद्या कोविड हॉस्पिटलात 119 जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
दुसऱया बाजूने सोमवारी राज्यात कोरोनाचे 46 नवे रुग्ण सापडले तर 17 जण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या 711 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 864 झाली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांकडून पुष्टी
मोर्ले-सत्तरी येथील या वृद्ध व्यक्तीला कोविडमुळे मृत्यू आल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. मृत्यू आलेल्या वृद्ध व्यक्तींच्या इतर कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने, त्यांच्यावर शिरोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत.
आजारी व्यक्ती चार वर्षांपासून अंथरूणावरच
मृत्यू आलेल्या मोर्ले येथील व्यक्तीला अस्थमा, मधुमेह असे इतर आजार होते. ही व्यक्ती गेली चार वर्षे अंथरूणारच होती. ही घटना दुर्दैवी असल्याचे आरोग्यमंत्री राणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले असून कुटुंबियांप्रती सहानभूती व्यक्त केली आहे.
या वृद्धाचा मुलगा, सूनही पॉझिटिव्ह
काल सोमवारी ज्याचे निधन झाले त्याचा मुलगा व सून 9 जून रोजी चाचणी घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी सुनेला ताप आला होता. मोर्लेतील घोडेमळ भाग अधिकृतपणे कंटेनमेंट झोन घोषित केल्यानंतर तीन दिवसांनी मुलगा व सून तपासणीसाठी गेले होते. त्यांची चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर पुन्हा 12 जून रोजी घेण्यात आलेली दुसरी चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यानंतर दोघेही शिरोडा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल आहेत. या दोघांनी त्यांचा संपर्क आलेल्या 17 लोकांची नावे आरोग्य खात्याला दिली होती. त्या सर्वांची चाचणी घेण्यात आली असता ते सर्वजण निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे या वृद्ध व्यक्तीला जीएमसीत कॅज्युअल्टी वॉर्डमध्ये आणले गेले. तेथून त्याला क्रिटिकल केअर रूम (सीसीआर) आणि नंतर आयसोलेशन वॉर्ड 113 मध्ये हलविण्यात आले, जेथे कोविड संशयितांवर उपचार केले जातात. तेथे कोविडसाठी घेण्यात आलेली चाचणी पॉझिटिव्ह निघाली. रविवारी त्याला मडगाव येथील कोविड रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे काल सोमवारी सकाळी 5.45च्या दरम्यान प्राणघातक विषाणूने त्याचा बळी घेतला.
सरकारतर्फे केले जाणार अंत्यसंस्कार
कोविडमुळे मृत्यू आल्याने प्रोटोकॉल प्रमाणे, मृतदेह नातेवाईकांडके सुपूर्द केला जाणार नाही. आरोग्य खात्यातर्फे अंत्यसंस्कार केले जातील. सद्या मृतदेह कोविड हॉस्पिटलच्या शवागरात ठेवण्यात आला आहे. जर एखाद्या नातेवाईकाला दर्शन घ्यायचे असल्यास, चेहरा पाहता येईल असे पारदर्शक प्लास्टिक वापरण्यात आलेले आहे.
पणजी पाटो न्यायालयीन कर्मचारी कोरोनाग्रस्त
राजधानीत पाटो परिसरात असलेल्या स्पेसिस इमारतीत स्थित न्यायालयाच्या नोंदणी विभागातील कर्मचारी कोरोनाग्रस्त सापडल्याने न्यायालयासह संपूर्ण इमारत सील करण्यात आली आहे.
सदर महिलेचा पती कोविड पोझिटिव्ह होता. तेव्हापासून ती महिला गेले 6 दिवस रजेवर होती. सोमवारी तिचा चाचणी अहवाल पोझिटिव्ह निघाल्याचे उघड होताच संपूर्ण इमारत खाली करण्यात आली व निर्जंतुकीकरणाचे काम तातडीने हाती घेण्यात आले. नोंदणी विभागातील सदर महिला स्टाफशी संपर्कात आलेल्या वकिलांनी व अशिलांनी आवश्यक असल्यास आपली चांचणी करून घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, न्यायालयाचे कामकाज पणजीत जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारतीतील ई क्रमांकाच्या न्यायालयात चालणार असून तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जाणार आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायालयातील खटले म्हापसा येथील न्यायालयात स्थलांतर करण्यात येणार आहेत.
माजी आरोग्यमंत्री कोरोनाबाधित
राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा डिचोली तालुक्यातील माजी आमदार तपासणीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सदर माजी मंत्र्यांना सरकारच्या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या या नेत्याला मूत्रपिंडाच्या विकाराने अगोदरच ग्रासले होते. त्यातच आता कोविडमुळे या माजी आरोग्यमंत्र्याचेही आरोग्य बिघडल्याचे दिसून आले. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही माहिती एका वृत्तवाहिनीला दिली. उपलब्ध माहितीनुसार माजी मंत्र्याची अधिक तपासणी करून नंतर त्यांना मडगावच्या कोविड इस्पितळात ठेवण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. सध्या त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
घोडेमळ परिसरात दुःखाची छाया
वाळपई / प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील मोर्ले ग्रामपंचायत क्षेत्रातील घोडेमळ या ठिकाणी 85 वषीय कोरोनाबाधित रुग्णाचे काल सोमवारी मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाल्यानंतर या भागामध्ये दुःखाची छाया पसरली आहे.
आरोग्य खात्याची यंत्रणा सतर्क असून काल सोमवारी वेगवेगळय़ा भागांमध्ये आरोग्य खात्याच्या पथकाने भेटी देऊन अहवाल तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व कोरोनाचा पहिला बळी गेल्यामुळे वाळपईच्या काँग्रेस समितीने सरकारच्या निष्काळजीपणामुळेच हा बळी गेल्याचा आरोप केला आहे. यामुळे सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणी समितीने केली आहे.
घोडेमळ, कासारवाडा येथे अनेकांची चाचणी
घोडेमळ येथील सर्वांची चाचणी करण्यात आली असून 233 नमुने गोळा करून तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी 20 रूग्ण वगळता इतर सर्वांची चाचणी नकारात्मक आल्याची माहिती हाती आली आहे. बफर झोन म्हणून जाहीर केलेल्या देऊळवाडा व कासारवाडा येथील रुग्णांची तपासणी सध्या सुरू आहे. कासारवाडा येथील रुग्णांची तपासणी काल सोमवारी पूर्ण करण्यात आली असून अहवाल मंगळवारी संध्याकाळपर्यंत येण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर देऊळवाडा येथील रुग्णांची संपूर्णपणे तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य खात्याच्या सूत्राकडून उपलब्ध झाली आहे.
दरम्यान सरपंच विद्या सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की कोणीही भीती बाळगण्याचे कारण नाही. आरोग्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या मागणीनुसार सरकारने या भागांमध्ये कंटेनमेंट झोन जाहीर केलेला आहे. सर्व नागरिकांनी आपल्या घरातच राहून आपल्या सुरक्षेसंदर्भात काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा ः काँग्रेस
गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात वाढणाऱया कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येमुळे सरकारची निषक्रियता सिद्ध झालेली आहे. नागरिकांच्या भवितव्याची व आरोग्याची काळजी घेण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरल्यामुळे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी वाळपई काँग्रेस समितीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून करण्यात आली आहे.
वाळपई गट काँग्रेस अध्यक्ष दशरथ मांदेकर, सरचिटणीस नंदकुमार कोपर्डेकर महिला अध्यक्ष रोशन देसाई व सेवादलचे उपाध्यक्ष सुरेश कोदाळकर यांची पत्रकार परिषदेत उपस्थिती होती. सरकारच्या अकार्यक्षतेमुळे ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोव्याने आता रेड झोनमध्ये जाण्यास सुरुवात केलेली आहे. घोडेमळमधील मृत्यू आलेला कोरोना रुग्ण एक महिला असल्याचे आरोग्य खात्याने जाहीर केले होते. यामुळे आरोग्य खात्यात नेमका कोणता प्रकार चाललेला आहे, हे सिद्ध होते. कंटेनमेंट झोनमध्ये तपासणीसाठी जाणाऱया कर्मचाऱयांची राहण्याची वेगळी व्यवस्था करावी अशा प्रकारची मागणी यावेळी करण्यात आली.