बेळगाव : पाच दिवसांच्या शोधमोहिमेनंतर नववा क्रॉस, शास्त्रीनगर येथील अजगराला रेल्वे ट्रकनजीक पकडण्यात यश आले. गेल्या गुरुवारी रात्री हा अजगर निदर्शनास आला होता. त्यानंतर सलग पाच दिवस शोधमोहीम सुरू होती. अखेर मंगळवारी रात्री अजगर हाती लागला असून या मोहिमेला यश आले आहे. अजगर दृष्टीस पडल्यापासून परिसरातील नागरिक भीतीच्या छायेखाली वावरत होते. अखेर अजगराला पकडून वनखात्याच्या अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
परिसरात जेसीबी आणि सकींग मशीनद्वारे अजगर शोधमोहीम सुरू होती. नाल्यात आलेल्या पाण्याचा प्रवाहामुळे हा अजगर आल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. भर वस्तीत अजगर नजरेस पडल्याने नागरिकांतून भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, मनपातर्फे सर्व ती यंत्रणा पुरवून शोधमोहीम सुरू होती. मंगळवारी रात्री गुड्सशेड रोडजवळील रेल्वे ट्रकशेजारी हा अजगर काहींच्या नजरेस आला. त्यानंतर सर्पमित्र गणेश दड्डीकर यांनी तातडीने दाखल होऊन त्याला पकडले. अर्ध्या तासाच्या परिश्रमानंतर तो हाती लागला आहे. साधारण 12 फूट लांबीचा हा अजगर असल्याची माहिती मिळाली आहे. अखेर अजगराला पाचव्या दिवशी पकडून वनखात्याच्या अधिकाऱयांकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी वनसंरक्षणाधिकारी एम. व्ही. अमरनाथ, साहाय्यक संरक्षणाधिकारी मलिनाथ कुशनाळ, रेंज वनाधिकारी आर. एच. डेंबरगी, उपवनक्षेत्र अधिकारी विनय गौडर, सर्पमित्र गणेश दड्डीकर, रामा पाटील उपस्थित होते.









