लखनौ / वृत्तसंस्था
उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्या निकटवर्तीयांसह सपाच्या काही नेत्यांवर प्राप्तिकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. शनिवारी सकाळपासून सुरू झालेली प्राप्तिकर विभागाची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. छापे टाकण्यात आलेल्यांमध्ये मनोज यादव, जैनेंद्र यादव, सपा प्रवक्ते राजीव राय यांचा समावेश आहे. लखनौसोबतच मैनपुरी, आग्रा आणि मऊ आदी भागात छापे टाकण्यात आले असून केवळ द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप सपा प्रवक्ते राजीव राय यांनी केला आहे.
छापा टाकण्यात आलेले मनोज यादव हे अखिलेश यादव यांच्या जवळचे व्यक्ती आहेत. ते मैनपुरी येथील रहिवासी असून आरसीएल ग्रुपचे मालक आहेत. सकाळी सात वाजण्यापूर्वीच प्राप्तिकर अधिकारी 12 गाडय़ांचा ताफा घेऊन शहरातील मोहल्ला बंशीगोहरा येथील मनोज यादव यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. सुरुवातीला सुरक्षारक्षकांनी त्यांना आत जाण्यास मनाई केली. मात्र, आपण प्राप्तिकर अधिकारी असल्याची ओळख करून देताच त्यांनी कारवाईचा धडाका सुरू केला. दिवसभर अधिकारी घरातील लोकांची चौकशी करत होते. मैनपुरीबरोबरच लखनौ येथे अखिलेश यादव यांचे दुसरे निकवटवर्तीय जैनेंद्र यादव यांच्याही घरी छापेमारी करण्यात आली. जैनेंद्र यांचे घर लखनौच्या आंबेडकर पार्क याठिकाणी असून करचोरीच्या आरोपाखाली प्राप्तिकर विभागाने ही छापेमारी केली.
समाजवादी पार्टीचे प्रवक्ते राजीव राय यांच्या मऊ येथील घरावरही छापेमारी केली असून त्यानंतर राय यांनी आक्रमक प्रतिक्रीया दिली. राजकीय द्वेषातून ही कारवाई करण्यात आल्याचे राजीव यांनी म्हटले आहे. माझे काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही, मी अनेक गरजूंची मदत करत असतो. हीच गोष्ट सरकारला आवडत नसल्याने राजकीय द्वेषातून ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.









