अयोध्येत हनुमानगढीचे घेतले दर्शन
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी रामनगरी अयोध्येत पोहोचल्यावर हनुमानगढीचे दर्शन-पूजन करत ‘सॉफ्ट हिंदुत्वा’च्या स्वतःच्या अजेंडय़ाला धार देत भाजपला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. यादरम्यान त्यांनी रोड शोवेळी अनेक साधू-संतांना स्वतःच्या बरोबर घेतले होते.
अयोध्येत रामलल्लाचे दर्शन न करण्याप्रकरणी भाजपकडून अखिलेश यादव यांच्यावर निशाण साधण्यात येतो. अखिलेश यांना अल्पसंख्याक मते गमाविण्याची भीती असल्यानेच ते दर्शनासाठी जात नसल्याचा भाजपचा दावा आहे. भाजपच्या या आरोपांना अखिलेश यांनी हनुमानगढीचे दर्शन घेत राम मंदिर उभे राहिल्यावर रामल्लाचेही दर्शन घेणार असल्याचे म्हणत प्रत्युत्तर दिले आहे.
समाजवादी पक्षाचे सरकार आल्यास अयोध्येतील विकास थांबेल आणि मंदिर निर्मितीच्या कामात अडथळा निर्माण होणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. याच्या प्रत्युत्तरादाखल अखिलेश यांनी शरयू काठावर भजन स्थळ निर्माण करण्याचे काम सप सरकारने केल्याचा दावा केला आहे.
अखिलेश यादव यांच्या सरकारने 2015-16 मध्ये 15 कोटी रुपयांचा निधी खर्च करून हे भजनस्थळ निर्माण करविले होते. अखिलेश यांनी याची आठवण करून देत अयोध्येच्या विकासासाठी सप सरकारने अनेक कामे केली होती असा संदेश देण्याचा प्रयत्न केला. अखिलेश यादव यांनी पहिल्यांदाच रामनगरीत रोड शोच्या माध्यमातून लोकांशी थेट संवाद साधला आहे.









