नरकासुराचा कृष्णाने वध केल्यावर देव भगवंतांवर पुष्पवृष्टी करीत स्तुती करू लागले, तेव्हा पृथ्वी भगवंतांकडे आली. तिने भगवान श्रीकृष्णांच्या गळय़ामध्ये वैजयंतीमाळ आणि वनमाळा घालून, अदितीची तापलेल्या सोन्याप्रमाणे चमकणारी रत्नजडित कुंडले भगवंतांना दिली. त्याचबरोबर वरुणाचे छत्र आणि एक मौल्यवान रत्न त्यांना दिले. मोठमोठय़ा देवतांनी पूजन केलेल्या त्या विश्वेश्वरांना प्रणाम करून, हात जोडून, भक्तिभावयुक्त अंत:करणाने पृथ्वीदेवी त्यांची स्तुती करू लागली.
पृथ्वी म्हणाली-हे शंखचक्रधारी देवदेवेश्वरा! मी आपणास नमस्कार करीत आहे. हे परमात्मन! आपण आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यानुसारच आपले रूप प्रकट करता. आपणास मी नमस्कार करते. प्रभो! आपल्या नाभीतून कमल प्रगट झाले आहे. आपण कमळांची माळ गळय़ात घालता. आपले नेत्र कमळासारखे असून चरणही कमलाप्रमाणे सुकुमार आहेत. आपणास मी वारंवार नमस्कार करीत आहे.
आपण सर्व ऐश्वर्य, धर्म, यश, संपत्ती, ज्ञान आणि वैराग्याचे आश्रय आहात. आपण सर्वव्यापक असूनही स्वत: वसुदेवपुत्राच्या रूपाने प्रगट झाला आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण सर्व कारणांचेही परम कारण आदिपुरुष आहात. मी आपणास नमस्कार करीत आहे. आपण स्वत: जन्मरहित असून या जगाचे जन्मदाते आहात. जगाचे जे काही कार्यकारणमय रूप आहे. जे चराचर आहे, ते सारे आपलेच स्वरुप आहे.
प्रभो! जेव्हा आपण जग उत्पन्न करू इच्छिता, तेव्हा उत्कट रजोगुणाचा, जेव्हा प्रलय करू इच्छिता, तेव्हा तमोगुणाचा आणि जेव्हा याचे पालन करू इच्छिता, तेव्हा सत्त्वगुणाचा स्वीकार करता. परंतु या तिन्ही गुणांनी आपण झाकले जात नाही.
हे जगत्पते! आपण स्वत:च प्रकृती, पुरुष आणि काळ आहात. तसेच या तिन्हींच्या पलीकडील आहात. हे भगवान, मी (पृथ्वी), जल, अग्नी, वायू, आकाश, पंचतन्मात्रा, मन, इंद्रिये आणि त्यांच्या अधि÷ात्री देवता, अहंकार व महत्तत्त्व असे हे संपूर्ण चराचर जग आपल्या अद्वितीय स्वरूपामध्ये भ्रमामुळेच पहात आहे. प्रत्यक्ष भौमासुरमर्दन । करूनियां मारिलें अपार सैन्य । मी तंव नरकाचा नंदन । मजलागून हरि कां न मरी । सहजजातिनिसर्गवैर । विशेष शत्रूचा मी कुमर । मजला देखतांचि श्रीधर । करील संहार तत्काळ । ऐसी भयाची कणकणी । पितृशोकार्त अंतःकरणीं । म्हणोनि म्यां तुझिये चरणीं । प्रविष्ट केला प्रपन्न । तूं तंव प्रपन्नार्तिहर । हा तव बिरुदाचा बडिवार । तरी याचे मस्तकीं अभय कर । ठेवोनि किंकर पाळीं हा । जन्मला नरकासुराच्या कुसीं । म्हणसी केवळ कल्मषराशि । तरी अभय हस्त त्वां ठेविजे शिशीं । अखिल अघांसी तूं हंता ।
पृथ्वी पुढे म्हणाली-हे शरणागतभयभंजना, प्रभो! माझा पुत्र असलेल्या भौमासुराचा हा भगदत्त नावाचा पुत्र भयभीत झाला आहे. मी याला आपल्या चरणकमलांजवळ घेऊन आले आहे. प्रभो! आपण याचे रक्षण करावे आणि जे साऱया जगाचे पाप-ताप नष्ट करणारे आहे, ते करकमल याच्या मस्तकावर ठेवावे.
Ad. देवदत्त परुळेकर








