नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजप पंजाबने आपला जुना सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दलाला धक्का दिला आहे. शुक्रवारी भाजपने शिरोमणी अकाली दलाच्या तीन नेत्यांना पक्षात प्रवेश दिला. यामध्ये जालंधर कॅटचे माजी अकाली आमदार सरबजीत सिंग मक्कर आणि दोनवेळा सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले अकाली नेते अवतार सिंग जीरा यांचा समावेश आहे. या दोघांशिवाय फतेहगढ साहिबमध्ये तब्बल 18 वर्षे युवा अकाली दलाचे नेतृत्त्व करणाऱया गुरप्रीत सिंग भाटी यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. एकेकाळी सुखबीर बादल यांच्या जवळचे असलेले भाटी यांनी 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षात प्रवेश केला होता. मात्र, आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपात दाखल झाले. या तिघांव्यतिरिक्त, माजी डीजीपी एसएस विर्क यांच्यासह पंजाबमधील अन्य 21 जणांनीही शुक्रवारी भाजपमध्ये प्रवेश केला. दोन दिवसांपूर्वी ज्ये÷ अकाली नेते मनजिंदर सिंग सिरसा यांनी दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीच्या प्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.
अकाली दलाचे प्रमुख सुखबीर बादल जालंधर जिह्याच्या दौऱयावर असताना भाजपने शुक्रवारी सरबजीत सिंग मक्कर यांना पक्षात प्रवेश दिला. नवी दिल्लीत भाजपचे पंजाब निवडणूक प्रभारी गजेंद्र सिंह शेखावत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर मक्कर यांनी आपण जालंधर कॅट विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.









