प्रतिनिधी/ पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या मंत्रिमंडळात बदल करुन काम न करणाऱया मंत्र्यांना घरी बसवावे व नव्या मंत्र्यांचा समावेश करावा, अशी मागणी विज्ञान व तंत्रज्ञानमंत्री मायकल लोबो यांनी केली आहे.
मंत्री लोबो यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची विधानसभा प्रकल्पातील त्यांच्या दालनात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी एका वृत्तवाहिनीवर बोलताना व त्यानंतर दैनिक ‘तरुण भारत’शी बोलताना मंत्री मायकल लोबो यांनी मंत्रिमंडळात फेरबदलाची गरज व्यक्त केली.
आगामी विधानसभा निवडणुकीला अद्याप 1 वर्ष 10 महिने आहेत. या दरम्यान आम्ही मंत्रिमंडळात आता बदल केला नाही तर संभाव्य कठीण परिस्थितीला आम्हाला तोंड द्यावे लागेल, असेही ते म्हणाले. काही मंत्री बरोबर वागत नाहीत. अशा मंत्र्यांना घरी बसवून दुसऱया व्यक्तींना संधी देण्याची गरज आहे. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा आढावा घ्यावा व नंतर मंत्रिमंडळात फेरबदल तसेच खाते वाटपातही लक्ष घालून फेरबदल घडवून आणणे गरजेचे आहे. आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीनंतर लागलीच खात्यांत बदल आणि मंत्रिमंडळाची फेररचना करणे आवश्यक आहे. हा निर्णय घेतल्याशिवाय मुख्यमंत्र्यांसमोर पर्याय राहणार नसल्याचेही मत लोबो यांनी व्यक्त केले.
मायकल लोबो यांच्या वक्तव्याने मात्र मंत्रिमंडळात एकच खळबळ माजली आहे.









