– राजवाडा पोलिसांची कारवाई
प्रतिनिधी/कोल्हापूर
करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी ई पास न काढताच बेकायदेशीरपणे कट्यारसारखे हत्या घेवून मंदिरात प्रवेश करणाऱ्या तरुणास जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सोमवारी सकाळी मंदिराच्या पुर्व दरवाजाजवळ ही कारवाई करण्यात आली. अरुण अशोक घोलपे (वय 34, रा. वेताळ पेठ, गल्ली क्रमांक तीन, इचलकरंजी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात प्रवेशासाठी ई पास सक्तिचा करण्यात आला आहे. मात्र तरीही सोमवारी सकाळी 9. 30 ते 9. 45 वाजण्याच्या सुमारास मंदिराच्या पुर्व दरवाजातून अरुण घोलपे हा विना परवाना आत जाण्याचा प्रयत्न करीत होता. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी करीत असताना अंग झडतीत कट्यार सारखे धारदार शस्त्र आढळले. त्यामुळे जुना राजवाडा पोलीसांनी शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4 व कलम 188 प्रमाणे कारवाई करीत ताब्यात घेऊन गुन्हा नोंदविला. याबाबतची फिर्याद धनंजय सखाराम परब ( वय 52, नेमणुक पोलीस मुख्यालय) यांनी दिली. त्यानूसार संशयिताला अटक करण्यात आली.









