अंतराळात 8 किलोमीटर प्रति सेकंदाच्या वेगाने 9 लाख तुकडे फिरत आहेत. हे तुकडे नष्ट झालेल्या उपग्रहांचे आहेत. जगभरातील देशांमध्ये उपग्रह प्रक्षेपणाच्या सुरू असलेल्या चढाओढीदरम्यान जय एखादा मोठा तुकडा वातावरणात दाखल होताच वेळीच पूर्णपणे जळून खाक न झाल्यास पृथ्वीवर मोठे नुकसान घडवू शकतो.
अंतराळात जमा हा कचरा हटविण्यासाठी अमेरिकेच्या नासासह अनेक देशांच्या यंत्रणा नव्या आणि अनोख्या पद्धतींचे परीक्षण करत आहेत. अनेक खासगी कंपन्यादेखील या क्षेत्रात स्वतःच्या भविष्यातील एक मोठा उद्योग म्हणून पाहत आहेत. केवळ जपानमध्येच अशा चार कंपन्या आहेत.

याच कंपन्यांपैकी एक आहे एस्ट्रोस्केल. याचे संस्थापक आणि सीईओ नोबु ओकाडा यांनी 22 मार्च रोजी कजाकिस्तानच्या बायकोनूर येथून सोयूज प्रक्षेपकाद्वारेच ‘एल्सा डी’ उपग्रह प्रक्षेपित करत मोहीम सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. एल्सा-डी दोन उपग्रहांनी मिळून तयार झालेला आहे. एक 175 किलोग्रॅमचा सर्व्हिसर उपग्रह तर दुसरा 17 किलोंचा क्लायंट उपग्रह आहे. सर्व्हिसर उपग्रह अनेक तंत्रज्ञानांचे ठिकाण असून त्यात चुंबकीय डॉकिंग मॅकेनिजम आहे.
बिघाड झालेले उपग्रह आणि ढिगाऱयाच्या मोठय़ा तुकडय़ांना हटविण्याचे काम याच उपग्रहाद्वारे होते. जाक्सा या जपानी कंपनीने इलेक्ट्रोडायनामिक भुयाराद्वारे कचरा साफ करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. 700 मीटर लांब इलेक्ट्रोडायनामिक भुयार स्टेनलेस स्टील आणि ऍल्युमिनियमध्ये तयार झालेले असेल. हे भुयार कचऱया वेगवान प्रदक्षिणेला मंद करेल आणि त्याला हळूहळू वायुमंडळाच्या दिशेने ढकलणार आहे.
जर्मनीची अंतराळ संस्था ‘डीएलआर’ने अंतराळातच कचरा नष्ट करणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे. युरोपीय अंतराळ संस्थेने गारबेज रोबोट तयार केला आहे. उपग्रहाला पकडून पृथ्वीवर परत आणण्याचे काम हा रोबोट करणार आहे.









