छोटा राजनच्या मृत्यूच्या वावडय़ानंतर ‘एम्स’कडून खुलासा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन याचे कोरोनाने निधन झाल्याचे वृत्त शुक्रवारी प्रसारमाध्यमांवर पसरले होते. मात्र, काही वेळातच ‘एम्स’ रुग्णालय आणि दिल्ली पोलिसांनी खुलासा केल्यानंतर ‘अंडरवर्ल्ड डॉन अभी जिंदा’ असल्याचे स्पष्ट झाले. राजनवर नवी दिल्लीमधील ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्स म्हणजेच एम्समध्ये उपचार सुरू आहेत. शुक्रवारी काही प्रसारमाध्यमांनी उपचारादरम्यान राजनचा मृत्यू झाल्याची बातमी दिली होती. पण ‘एएनआय’ने काही वेळातच अधिकृत वैद्यकीय सूत्रांच्या हवाल्याने राजन जिवंत असल्याचे स्पष्ट केले होते.
छोटा राजनला तिहारच्या तुरुंगामध्येच एप्रिलच्या शेवटच्या आठवडय़ात कोरोनाची लागण झाली आहे. सुरुवातीला कारागृहातील रुग्णालयातच त्याच्यावर उपचार करण्यात आले. तथापि, कोरोनाची लक्षणे दिसल्यानंतर 26 एप्रिल रोजी त्याला एम्समध्ये हलविण्यात आले होते. 2015 मध्ये त्याला इंडोनेशियामधून अटक करण्यात आली होती. सध्या तो दिल्लीच्या तिहार तुरुंगात जेरबंद होता. त्याच्याविरोधात मुंबईतच खुनापासून खंडणीपर्यंत किमान 70 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याविरोधातील ही सर्व प्रकरणे सीबीआयच्या विशेष न्यायालयात वर्ग करण्यात आली असून त्याच्यावर सुनावणी सुरू आहे. काही प्रकरणात त्याला शिक्षाही सुनावण्यात आलेली आहे. मुंबईतील पत्रकार जे. डे. हत्याकांड प्रकरणी छोटा राजनला जन्मठेपेची शिक्षा सुनावलेली आहे.









