संगममाहुली येथे झोपेतच बहिणीवर चाकूने वार,
प्रतिनिधी/ सातारा
संगमाहुली (ता. सातारा) येथे पहाटेच्या सुमारास वंदना विजय शिंदे (वय 45) यांचा त्यांच्या सख्ख्या भावाने झोपेतच छातीत चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली. वंदना शिंदे या गावातच अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत होत्या. मुंबईतल्या खोलीच्या वादातून हा खून झाला आहे. पोलिसांना माहिती मिळताच संशयित नंदकुमार चंद्रकांत माने (रा. धारावी मुंबई) यास लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेमुळे तीर्थक्षेत्र असलेली दक्षिण काशी संगमाहुलीत खळबळ उडाली होती. मृतदेह शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले.
सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वंदना विजय शिंदे या संगममाहुलीत अंगणवाडी सेविका होत्या. त्यांचे पती, मुलगा असे त्या रहात होत्या. त्यांचे माहेर मूळचे पाटण तालुक्यातील आहे. वंदना यांचा संगममाहुलीत विवाह झाला. तेंव्हापासून ते संगममाहुली येथे राहत आहेत. दरम्यान, त्यांचा भाऊ नंदकुमार माने हा मुंबईत बीएसटीत नोकरी करतो. वडिलांनी धारावी येथे खोली घेऊन दिली तेथे तो रहातो. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या दिवशी लॉकडाऊन लागले त्याच दिवशी नंदकुमार हा बहिणीकडे संगमाहुली येथे रहाण्यास आला. सुरुवातीचे काही दिवस गोडीत गेले. मग धारावी येथील खोलीच्या कारणावरून दोघा बहीण भावात शाब्दिक वाद घडू लागले. रविवारी सगळे जेवण आटोपून झोपी गेले. नंदकुमार हा बेडवर तर घरातील इतर अन्यत्र झोपले होते. खोलीचा विचार सतत नंदकुमार याच्या डोक्यात घोळत होते. बहीण मला त्रास देते, आडकाठी करते असे विचार सतावत होते. सोमवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्याने बहिणीच्या घरातला धारधार चाकू घेतला अन् झोपी गेलेल्या बहिणीच्या छातीत वार केला. झोपेत झालेल्या वाराने वंदना यांनी एकच किंकाळी फोडली. रक्ताच्या थारोळ्यात तशीच निपचित पडली. बाजूलाच झोपलेला तिचा पती विजय आणि लहान मुलगा हे ही पुरते भयभीत झाले. विजय यांना काहीच करता आले नाही. नंदकुमार माने याचा भयानक अवतार पाहून त्यांनाही काय करावे हे सूचत नव्हते. विजय शिंदे यानी ही माहिती पोलीस पाटील श्रीमती धोत्रे यांना कळवली. त्या आजारी असुनही पहाटे त्यांनी फोन घेऊन लगेच संगमनगर पोलीस चौकीत माहिती कळवली.
सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस पथकासह सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख हे घटनास्थळी पोहचले. तोपर्यंत या घटनेमुळे संगमाहुलीत सन्नाटा पसरला होता. संशयित आरोपी नंदकुमार माने हा तिथेच बसून माझ्या बहिणीने मला लय ताप दिला आहे, असे बडबडत होता. पोलिसांनी चौकशी करून त्याला ताब्यात घेतला. मृत पावलेल्या वंदना शिंदे यांचे शवविच्छेदन जिल्हा रुग्णालयात करण्यात आले. या घटनेची फिर्याद विजय शिंदे यांनी दिली असून तपास सहायक पोलीस निरीक्षक वाळवेकर करत आहेत.









