वार्ताहर/ धामणे
धामणे ग्राम पंचायत कार्यक्षेत्रातील मासगोंडहट्टी, देवगणहट्टी येथील अंगणवाडीतील बालकांना वाटप करण्यासाठी शासनाकडून पुरविलेली आहार पावडरची पाकिटे बालकांना वाटप न करताच परस्पर विक्री करण्यात येत असल्याचे कळताच येथील नागरिकांनी विक्री करणाऱयांना पकडले.
येथील अंगणवाडी केंद्र क्रमांक 197 च्या प्रमुख चांगुणा मंगनाईक या अंगणवाडीसाठी शासनाने दिलेल्या आहाराच्या पाकिटांची अंगणवाडीच्या बालकांना वाटप न करता परस्पर विक्री होत असल्याचा सुगावाय sथील नागरिकांना लागला होता. यावर येथील नागरिकांनी पाळत ठेवल्याने रविवार दि. 20 रोजी सकाळी 10 च्या सुमारास पोती भरून आहाराची पाकिटे नेत असल्याचे उघडकीस आल्याने येथील नागरिकांनी लागलीच पोलिसांना दूरध्वनीद्वारे कळवून येथील घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याने तातडीने वडगाव ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पहाणी केली. या पोत्यातून 95 आहाराची पाकिटे होती.
असे प्रकार येथील अंगणवाडय़ातून सुरू असल्याचे येथील नागरिकांनी यावेळी पोलिसांना सांगितले. येथे मिळालेली आहार पाकिटे पोलिसांनी ताब्यात घेतली असून पुढील तपास पोलीस करीत असल्याचे कळते.









