प्रतिनिधी/ निपाणी
लहान मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करून त्यांच्या शिक्षणाचा पाया मजबूत करणाऱया अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकांना वारंवार मानधनासाठी टाहो फोडावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यापासून मानधन थकल्याने निपाणी भागात अंगणवाडी सेविका व सहाय्यिकांना अनेक प्रकारच्या अडचणी येत आहेत. मानधनात वारंवार अडथळे येत असल्याने अंगणवाडी कर्मचाऱयांतून तीव्र संताप व्यक्त होत असून याकडे वरि÷ अधिकाऱयांसह मंत्रिमहोदयांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
लहान मुलांना शिक्षणाबरोबरच पौष्टिक आहार देणे, पोलिओ लसीकरण, गरोदर व बाळंतीण यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आदी विविध कामे अंगणवाडी कर्मचारी करत असतात. निवडणूक विषयक कामेही सदर कर्मचारी करत आहेत. असे असताना निपाणी भागात अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिका यांच्या मानधनात वारंवार अडथळे येताना दिसत आहेत.
तीन महिन्यांचे वेतन नोव्हेंबरमध्ये
दीपावली काळातही तीन महिने मानधन न मिळाल्याने अंगणवाडी शिक्षिका व सहाय्यिकांना अनेक अडचणी आल्या. जुलै, ऑगस्ट सप्टेंबर असे तीन महिन्याचे मानधन नोव्हेंबर महिन्यात जमा करण्यात आले. यानंतर पुन्हा नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही. शिक्षणाबरोबर सरकारची विविध कामे वेळोवेळी केली जात असताना मानधनात मात्र चालढकल का?, असा सवाल अंगणवाडी शिक्षकांमधून उपस्थित होत आहे.
अंडी पुरवठय़ातही अडचणी
अंगणवाडी बालकांना आठवडय़ाच्या मंगळवारी व शुक्रवारी अंडी देणे, याशिवाय गरोदर स्त्रियांना दररोज अंगणवाडीमध्ये अंडी दिली जातात. मात्र या अंडय़ांचे पैसेदेखील वेळेवर दिले जात नाहीत. त्यामुळे स्थानिक दुकानातून उसनवारी करून अंडय़ांचा पुरवठा करण्याची वेळ अंगणवाडी कर्मचाऱयांवर आली आहे. एकूणच अंगणवाडी कर्मचाऱयांचे मानधन व अंडी पुरवठा केलेले पैसे असे कोटय़वधी रुपये प्रशासनाच्या घोळामुळे अडकले आहेत. याची गांभीर्याने दखल घेऊन मानधन तसेच अंडी पुरवठय़ासाठी आवश्यक रक्कम तात्काळ द्यावी, अशी मागणी होत आहे.









