प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावचे चार वेळेचे खासदार सुरेश अंगडी यांनी 30 मे 2019 ला केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. तेव्हापासून आजतागाएत त्यांनी नैऋत्य रेल्वे विभागात नव्या 50 रेल्वे सुरू केल्या. यातील बेळगावच्या वाटय़ाला 3 रेल्वे आल्या. त्यांच्यामुळे बेळगावच्या रेल्वे विकासाला गती मिळाली होती. रेल्वे स्थानकाचे नुतनीकरण, बेळगाव – धारवाड नवा रेल्वे मार्ग, मिरज – लोंढा रेल्वे मार्गाचे दुपरीकरण अशा विविध प्रकल्पांचे काम प्रगती पथावर होते.
केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री सुरेश अंगडी यांचे बुधवारी दु:खद निधन झाले. रेल्वे राज्यमंत्री पद मिळून अवघे 16 महिने झाले होते. या 16 महिन्याच्या कालावधीत त्यांनी बेळगाव तसेच कर्नाटकाला नवीन रेल्वे व प्रकल्प सुरू करून दिले. त्यांच्या मंत्रीपदामुळे बेळगावच्या रेल्वे विकासाला गती मिळाली होती. त्यांच्या जाण्याने रेल्वे विकासाला खीळ बसली अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
बेळगावमधील तीन रेल्वेंचा समावेश
बेळगाव ते बेंगळूर या दरम्यान धावणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस अंगडी यांनी सुरू केली. याबरोबरच गोव्याच्या प्रवाशांना बेळगावला दिवसा येता यावे याकरिता वास्को-बेळगाव ही द्वि साप्ताहिक रेल्वे सुरू केली. याचबरोबर बेंगळूरवरून येणारी सुपरफास्ट एक्स्प्रेस शेडबाळ पर्यंत सुरू केली. या तीन रेल्वे त्यांनी आपल्या कार्यकाळात बेळगावला मिळवून दिल्या.
बेळगाव – बेंगळूर रेल्वेला अंगडी यांचे नाव द्या
केंद्रीय रेल्वेराज्यमंत्री मंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या प्रयत्नातून बेळगाव ते बेंगळूर या मार्गावर रेल्वे सुरू केली. रात्रीच्यावेळी बेळगावमधून बेंगळूरला रेल्वे उपलब्ध झाल्याने अल्पावधीत या रेल्वेला मोठा प्रतिसाद मिळाला. तसेच बेळगावच्या नागरिकांचा प्रवास सुखकर झाला होता. त्यामुळे या रेल्वेला दिवंगत सुरेश अंगडी यांचे नाव द्या अशी मागणी बेळगावच्या नागरिकांमधून होत आहे.









