जागतिक स्तरावर चौथा गोलंदाज : यजमान इंग्लंड-पाकिस्तान तिसरी कसोटी अनिर्णीत, कसोटी मालिका इंग्लंडकडे
साऊदम्प्टन / वृत्तसंस्था
जेम्स अँडरसन कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा पहिला जलद गोलंदाज ठरला. मात्र, पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडला पाकिस्तानविरुद्ध तिसऱया व शेवटच्या कसोटीत विजयापासून वंचित रहावे लागले. पाचव्या दिवशी रोझ बॉलवरील या लढतीत सातत्याने पावसाचा व्यत्यय आला आणि अंतिमतः ही लढत अनिर्णीत राहिली. तीन सामन्यांची ही कसोटी मालिका इंग्लंडने 1-0 अशा फरकाने जिंकली आहे.
मंगळवारी खेळाच्या पाचव्या व शेवटच्या दिवशी पाकिस्तानने 4 बाद 187 धावा जमवल्या असताना खेळ थांबवावा लागला आणि त्यानंतर एकाही चेंडूचा खेळ होऊ शकला नाही. पाकिस्तानचा संघ यावेळी डावाने पराभव टाळण्यासाठी अद्याप 123 धावांनी पिछाडीवर होता.
या लढतीत इंग्लंडने पहिल्या डावात 8 बाद 583 धावांचा डोंगर रचल्यानंतर पाकिस्तानचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला होता. फॉलोऑन देण्यात आल्यानंतर दुसऱया डावात त्यांनी सावध फलंदाजी केली. मात्र, याही पेक्षा सातत्याने पावसाचा आलेला व्यत्यय त्यांच्या विशेष पथ्यावर पडला.
वास्तविक, मंगळवारी दुसऱया सत्रात पावसाची गडद छाया असताना आणि मैदान सर्द असताना जेम्स अँडरसन 600 बळींचा माईलस्टोन सर करु शकणार का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. पण, नंतर अचानक पावसाने पाठ फिरवली आणि सुपरसॉपरमुळे खेळ लवकर सुरु करता आला.
पुढे, अँडरसनने पाकिस्तानचा कर्णधार अझहर अलीला (31) स्लीपमधील जो रुटकडे झेल देणे भाग पाडले आणि 600 बळींचा माईलस्टोन थाटात गाठला. बाबर आझमने मात्र नाबाद 63 धावांसह एक बाजू लावून धरली आणि इंग्लंडला अपेक्षित असलेली नाटय़मय पडझड होणार नाही, याची काटेकोर काळजी घेतली. अँडरसन या कसोटीत उतरला, त्यावेळी त्याने निवृत्त व्हावे, अशीच मागणी टीकाकारातून जोर धरत होती. पण, कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळी घेणारा पहिला वेगवान गोलंदाज ठरत त्याने जणू या टीकेला चोख प्रत्युत्तरच दिले.
41 धावात 7 बळी ही अँडरसनची कसोटी डावातील सर्वोत्तम गोलंदाजी असून माजी फिरकीपटू अनिल कुंबळेचा 619 बळींचा विक्रम तो मोडू शकणार का, याचे आता औत्सुक्य असेल. यजमान इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात आता 3 टी-20 सामने होणार असून त्यातील पहिली टी-20 शुक्रवारी खेळवली जाणार आहे. तूर्तास, इंग्लंडचा कसोटी हंगाम येथे संपला असून पुढील वर्षी ते भारत दौऱयावर येणार आहेत.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड पहिला डाव : 8-583 वर घोषित.
पाकिस्तान पहिला डाव : सर्वबाद 273.
पाकिस्तान दुसरा डाव : 83.1 षटकात 4-187 (बाबर आझम 92 चेंडूत नाबाद 63, अबिद अली 162 चेंडूत 42, अझहर अली 114 चेंडूत 31, असद शफीक 59 चेंडूत 21, शान मसूद 66 चेंडूत 18. अवांतर 12. जेम्स अँडरसन 19 षटकात 2-45, स्टुअर्ट ब्रॉड, जो रुट प्रत्येकी 1 बळी).
उभय संघात शुक्रवारी पहिली टी-20 लढत होईल.
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
गोलंदाज / संघ / सामने / बळी / डावात सर्वोत्तम / सामन्यात सर्वोत्तम
मुथय्या मुरलीधरन / श्रीलंका / 133 / 800 /9-51 / 16-220
शेन वॉर्न / ऑस्ट्रेलिया / 145 / 708 / 8-71 / 12-128
अनिल कुंबळे / भारत / 132 / 619 / 10-74 / 14-149
जेम्स अँडरसन / इंग्लंड / 156 / 600 / 7-42 / 11-71
ग्लेन मॅकग्रा / ऑस्ट्रेलिया / 124 / 563 / 8-24 / 10-27
कर्टनी वॉल्श / विंडीज / 132 / 519 /7-37 / 13-55
स्टुअर्ट ब्रॉड / इंग्लंड / 143 / 514 / 8-15 / 11-121
डेल स्टीन / द. आफ्रिका / 93 / 439 / 7-51 / 11-60
कपिल देव / भारत / 131 / 434 / 9-83 / 11-146
रंगना हेराथ / श्रीलंका / 93 / 433 / 9-127 / 14-184









