सांगली / सुभाष वाघमोडे :
जिल्हा परिषदेच्या पहिली ते चौथीच्या शाळांना घरघर लागत असताना मिरज तालुक्यातील सिध्देवाडीची शाळा पहिली ते दहावीपर्यंत करण्यात ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषदेला यश आले आहे. यंदा प्रथमच दहावीचा वर्ग सुरू करणारी सिध्देवाडी शाळा पश्चिम महाराष्ट्रातील पहिली ठरली आहे. जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासात हा मानाचा तुरा ठरणार आहे.
बालकाचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार शासनाने लागू केला आहे. यानुसार शून्य ते अठरा वर्षापर्यंतचे एकही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठीची खबरदारी घेवून शासन काम करीत आहे. आठवीनंतर पुढील शिक्षणाची परिसरात सुविधा नसल्याने अनेक विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाजुला जात असल्याची माहिती शासनाने केलेल्या राज्यस्तरीय सर्व्हेक्षणातून समोर आली. यानंतर शासनाने गावागावत सुरू असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्येच नववी आणि दहावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. 15 मार्च 2024 च्या निर्णयानसुसार राज्यात याची अंमलबजावणी केली जात आहे.
यासाठी सिध्देवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची निवड करण्यात आली. गेल्या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत नववीचा वर्ग सुरू करण्यात आला. येत्या शैक्षणिक वर्षापासून दहावीचा वर्ग सुरू केला आहे. सध्या नववीमध्ये 62 तर दहावीच्या वर्गात 46 विद्यार्थी आहेत. शासनाच्या या निर्णयाने मुलांच्या शिक्षणाची सोय झाल्याने पालकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
- शिक्षक, वर्ग खोल्या अपुऱ्याच
सिध्देवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ही पहिली ते आठवीपर्यंत होती. ही मॉडेल स्कूल आहे. शासनाने नववी आणि दहावीचे वर्ग सुरू केले. मात्र यासाठी पुरेसे शिक्षक आणि वर्ग खोल्या दिल्या नाहीत. सध्या शाळेत 562 विद्यार्थी संख्या असून फक्त 14 शिक्षक कार्यरत आहेत. पटानुसार आणखी किमान चार शिक्षकांची गरज आहे. शाळा खोल्याही अपुऱ्या आहेत. शाळेच्या 13 खोल्या आहेत. पट संख्या आणि वर्ग जास्त असल्याने संगणक कक्ष, ग्रंथालय, लॅब, स्टोअररूमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्याची वेळ आली आहे. मॉडेल स्कूलमध्ये 43 लाख खर्च करून पाच वर्ग खोल्या बांधण्यात आल्या आहेत. लोकर्गणीतून शाळेला 25 लाखांची मदत करण्यात आली आहे.
- मुख्यमंत्री सुंदर शाळा अभियानात ५ जिल्ह्यात प्रथम
सिध्देवाडी जिल्हा परिषद शाळेचा 2024-25 मध्ये शासनाच्या मुख्यमंत्री स्वच्छ सुंदर शाळेत कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यात प्रथम क्रमांक आला आहे. शाळेला 25 लाखाचे बक्षिस मिळाले आहे. याशिवाय याच अभियानात शाळेला तालुक्यात प्रथम क्रमाकांचे तीन लाखाचे बक्षिस मिळाले होते. गुणवत्ता शोध, एनएमएससह इतर स्पर्धा परीक्षेतही विद्यार्थ्यांनी चमक दाखविली आहे.
- चांगला निर्णय पण शिक्षक, वर्ग खोल्या द्याव्यात
शासनाने जिल्हा परिषद शाळेत नववी आणि दहावी पर्यंतचे वर्ग सुरू करून चांगला निर्णय घेतला आहे. मुलांच्या पुढील शिक्षणाची सोय झाली आहे. मात्र सध्या शाळेत शिक्षकांची संख्या अपुरी आहे. वर्ग खोल्याही कमी आहेत. याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जेणेकरून शैक्षणिक गुणवत्ता वाढीस आणखी मदत होईल.
– संतोष वाघमोडे,पालक








