महापालिकेच्या आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता
कोल्हापूर : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यांत घेण्याचे निर्देश न्यायालयाने गेल्या महिन्यात दिले. त्यानंतर निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला असून निवडणूक आयोग आणि जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. चार दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने महापालिकेची प्रभागरचना करण्याची सूचना केली. पण महापालिकेच्या आधी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत 29 मे रोजी उपजिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यामुळे महापालिकेच्या प्रभाग रचनेबाबत शासन आदेश जारी झाला असला तरी मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुका त्याआधी होण्याची शक्यता आहे.
2011 ची ग्रामीण लोकसंख्या विचारात घेऊन गट, गणाची निश्चिती करायची आहे. त्यामुळे सदस्यसंख्या 2017 प्रमाणेच निश्चित होणार आहे. पंचायत समिती गणाची रचना करत असताना जिल्हा परिषद गट, पंचायत समितीची एकूण लोकसंख्या भागिले त्या गट, गणास देय असलेली एकूण सदस्य संख्या या सूत्रानुसार ही सदस्य संख्या निश्चित होणार आहे.
गणाची सरासरी लोकसंख्या 10 टक्के जास्त किंवा कमी ठेवता येणार नाही. जिल्हा परिषदेमध्ये कमीत कमी 50 आणि जास्तीत जास्त 75 सदस्य राहतील, अशा पध्दतीने प्रभाग रचना करण्याच्या सूचना आहेत. प्रभाग रचनेच्या कामाचा वेग पाहता ऑगस्टनंतर निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.








