महिला आरक्षण आल्यास उमेदवारांच्या सौभाग्यवतींना संधी मिळणार?
By : विजयकुमार दळवी
चंदगड : गेल्यावेळी गोपाळराव पाटील आणि संध्यादेवी कुपेकर यांनी युवक क्रांती आघाडीच्या बॅनरखाली निवडणूक लढविली होती, तर माजी मंत्री भरमू पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील, ओमसाई आघाडी यांनी काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविली होती. चंदगड तालुक्यात दोन्ही आघाड्यांना दोन-दोन जागा मिळाल्या होत्या.
चंदगड जिल्हा परिषदेची जागा कॉंग्रेसच्या सचिन बल्लाळ यांनी जिंकली होती. यावेळी चंदगड हे सुमारे ८ हजार मतदारांचे शहर जिल्हा परिषदेतून वजा होणार आहे. त्या मतदारांच्या भरपाईसाठी अन्य दोन-चार गावांचा मतदारसंघात समावेश होण्याची शक्यता आहे.
चंदगड जि. प. मध्ये पूर्वी बुजवडे, कुरणी, कानूर खुर्द, पुंद्रा, सडेगुडवळे, भोगोली, इनाम म्हाळुंगे, हिंडगाव, चंदगड, कोकरे, अडकूर, बोंजुर्डी, विंझणे, आसगोळी, केरवडे, सातवणे, केंचेवाडी, उत्साळी, अलबादेवी, शिरोली, कानडी, मजरे शिरगाव, गवसे, इब्राहिमपूर या ग्रामपंचायतींचा समावेश होता.
यावेळी प्रत्येक मतदारसंघात ४० ते ४५ हजार मतदार अपेक्षित असल्यामुळे या मतदारसंघात आणखी दोन-चार गावे वाढण्याची शक्यता आहे. चंदगड जि. प. मतदारसंघ विस्ताराने मोठा असून प्रचार यंत्रणा अत्यल्प वेळेत राबविणे उमेदवारांना आव्हान ठरणारे आहे. या मतदारसंघातून सचिन बल्लाळ,
लक्ष्मणराव गावडे, नामदेव पाटील, विशाल पाटील, दयानंद काणेकर, प्रवीण वाटंगी, राजेंद्र परीट, इरफान सय्यद, अनिल दळवी, एन. डी. पाटील, अमित चिटणीस, मोहन परब, अभय देसाई, बबनराव देसाई, राजेश शि. पाटील आदींची संभाव्य उमेदवार म्हणून नावे चर्चेत आहेत.
अद्याप आरक्षण निश्चित झालेले नाही. मात्र महिला आरक्षण आल्यास याच उमेदवारांच्या सौभाग्यवतींना संधी मिळू शकते. गेल्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे यावेळी बदलण्याची शक्यता आहे. कारण तालुक्याला नवा आमदार मिळालेला आहे.
गेल्या निवडणुकीत राजेश पाटील आणि भरमू पाटील गटाची युती होती. तर त्यांच्या विरोधात गोपाळराव पाटील आणि संध्यादेवी कुपेकर यांची युती होती. यावेळी नवे आमदार शिवाजी पाटील आणि भरमू पाटील एकत्र आहेत. त्यांच्या विरोधात गोपाळराव पाटील, राजेश पाटील आणि नंदाताई बाभुळकर काय भूमिका घेतात, याकडे लक्ष आहे.
माजी आमदार राजेश पाटील स्वबळावर निवडणूक लढवितात की आणखी कुणाची मदत घेतात, याचीही उत्सुकता आहे. नुकताच आमदार सतेज पाटील यांनी चंदगड येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला असून महाविकास आघाडीचा पॅ टर्न वापरून निवडणूक लढविण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केलेला आहे.
विद्यमान आमदार शिवाजी पाटील यांनीही कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन निवडणुकीची तयारी चालविली आहे. त्यामुळे या मतदारसंघात ऐन पावसाळ्यात आता राजकीय वातावरण गरम होऊ लागले आहे. मतदारसंघाची होणारी फेररचना, पडणारे आरक्षण, त्यानंतर होणाऱ्या विविध पक्ष आणि गटातटाच्या युतीवरच भवितव्य ठरणार आहे.








