खानापूर : बेळगाव जिल्हा पंचायतीचे (मुख्य कार्यकारी अधिकारी) सीईओ राहुल शिंदे यांनी खानापूर येथील विविध शासकीय कार्यालयांना अचानक भेटी देऊन पाहणी केली. त्यामुळे अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. राहुल शिंदे हे सकाळी थेट तालुका पंचायत कार्यालयात हजर झाले. दौऱ्याची कोणतीही कल्पना नसताना आल्याने खानापूर सरकारी अधिकाऱ्यांची एकच धांदल उडाली होती. यावेळी तालुका पंचायतीचे अधिकारी रमेश मेटे यांनी त्यांचे स्वागत केले यानंतर शिंदे यांनी तालुका पंचायतीत कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. तालुका पंचायतीच्या कार्यालयाच्या सर्व विभागाची माहिती घेतली तसेच येथील सभागृहाची पाहणी करून सभागृहातील व्यवस्थापनाबाबत सूचना केल्या. यानंतर तालुका सरकारी रुग्णालयात भेट दिली.
प्रथम माता शिशु रुग्णालयात भेट देऊन तेथील डॉक्टरांशी आणि कर्मचाऱ्यांशी चर्चा करून विविध सूचना केल्या तसेच आरोग्यसेवा योग्य प्रकारे देण्यात यावी तसेच सर्वसामान्य जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागू नये याची खबरदारी वैद्याधिकाऱ्यांनी घ्यावी, अशा सूचना केल्या. त्यानंतर येथील कन्नड प्राथमिक शाळेत भेट देऊन शैक्षणिक दर्जाबाबत शिक्षकांना सूचना केल्या. तसेच सर्व सुविधांची पाहणी केली. विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे शौचालयाची उपलब्धता करून देण्याची सूचना केली तसेच विद्यार्थ्यांच्या मध्यान्ह आहाराबाबत कोणतीही तडजोड करू नये. योग्य प्रकारे आहार द्यावा अशा सूचना केल्या. यानंतर त्यांनी शिवस्मारक जवळील दुकान गळ्याची पाहणी केली. पाहणी दौऱ्यात डॉ.नारायणवाडी पंचायत राज विभागाचे राजेंद्र जाधव आदी उपस्थित होते.









