तालुक्यातील गावांतील कामांची केली पाहणी : अधिकाऱ्यांना स्वच्छ पाणीपुरवठ्याच्या सूचना
बेळगाव : हुक्केरी तालुक्यातील विविध गावांना भेट देऊन जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी जलजीवन मिशन कामांची पाहणी केली. तसेच पाण्याच्या टाकीची स्वच्छता करून स्वच्छता केलेली तारीख नमूद करण्यासह विविध सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच नागरिक व शाळांना भेटी देऊन समस्या ऐकून घेत निवारण करण्याचे आश्वासन दिले. प्रारंभी कोट ग्रा. पं. व्याप्तीतील बेळ्ळंकी व नागनूर के. डी. ग्रा. पं. व्याप्तीतील बिद्रेवाडी गावाला भेट देऊन जलजीवन मिशन योजनेंतर्गत केलेल्या कामांची पाहणी केली. तसेच पाण्याची टाकी स्वच्छ करून त्यावर स्वच्छतेची तारीख नोंद करण्याची सूचना केली. यानंतर नळजोडणीबाबत चर्चा करून नळसंपर्क नकाशाची पाहणी केली. त्यानंतर बिद्रेवाडी प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
यानंतर चिक्कालगुड्ड तेथील राज्य ग्रामीण उपजीविका अंतर्गत स्थापन केलेल्या संजीवनी श्रमजीवी वनधन विकास केंद्राला भेट दिली. केंद्रात उत्पादित होणाऱ्या पिशव्या, कुर्ता, गोधडी, केळीच्या झाडापासून तयार होणाऱ्या साहित्यांसह इतर उत्पादनांची पाहणी केली. तेथील महिला कर्मचाऱ्यांशी संवाद साधत केंद्रात टी-शर्ट तयार करण्याचा सल्ला त्यांनी दिला. केस्ती ग्रा. पं. व्याप्तीतील अकिवाट व आलूर के. एम. गावाला भेट देऊन नळजोडणी केंद्राची पाहणी करून ग्रा. पं. अध्यक्ष व सदस्यांशी चर्चा करून स्वच्छ पाणीपुरवठा करण्याच्या सूचना केल्या. यावेळी पाणी व स्वच्छता विभागाचे ईई पांडुरंगराव, ता. पं. ईओ टी. आर. मल्हाडद, पंचायतराज साहा. संचालक राजू डांगे, लक्ष्मीनारायण, गटशिक्षणाधिकारी प्रभावती पाटील, फलोत्पादन साहा. संचालक मारुती कळ्ळीमणी, झोनल अधिकारी चेतन कडकोळ, ज्योती बडगावी, संतोष पाटील आदी उपस्थित होते.









