नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांची माहिती : पेडणे विकासासाठी प्लॅन आवश्यक असल्याचा दावा
पणजी : पेडणे तालुक्याचा वादग्रस्त ठरलेला क्षेत्रीय जमीन रूपांतर आराखडा (झोनिंग प्लॅन) स्थगित करण्यात आला असून केंद्राकडे तसेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजित राणे यांनी काल सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. सदर निर्णयामुळे त्या प्लॅनला विरोध करणाऱ्या पेडण्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. राणे यांनी सांगितले की, पेडणे तालुका हा विकासापासून दूर राहिला असून तेथील जनतेला आपल्या हक्काची जमीन असतानाही विकासाची कोणतीच कामे करता येत नाहीत, अशी परिस्थिती आहे. ती कामे करता यावीत म्हणून तो जमीन रुपांतर आराखडा म्हणजेच फक्त मसुदा तयार करण्यात आला आहे. तो अंतिम आराखडा नव्हे. नगरनियोजन खात्याने तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार केला आहे, असा दावा राणे यांनी केला.
आराखडा नसल्याने प्रकल्प रखडले
हा प्लॅन नसल्यामुळे सरकारी प्रकल्पही रखडले आहेत असे सांगून राणे म्हणाले की, पेडणे तालुक्यातील प्रत्येक पंचायतीला तो मसुदा पाठवण्यात आला असून तो जनतेला पहाण्यासाठी खुला आहे. त्यात रस्ते, जोडरस्ते, प्रकल्प व त्यांचे रस्ते, धार्मिक स्थळे, सार्वजनिक जागा, उद्याने यासाठी योग्य त्या जागा राखून ठेवण्यात आल्या असून त्यानुसार बदल करण्यात येणार आहेत. जवळपास 20 वर्षानंतर हा आराखडा नव्याने तयार करण्यात आला असून इतकी वर्षे त्याकडे कोणीच लक्ष दिले नाही, असेही त्यांनी नमूद केले. “मी पुर्वीच्या नगरनियोजन मंत्र्यासारखा नाही. माझे चारित्र्य वेगळे आहे’,’ असा टोमण राणे यांनी माजी नगर-नियोजन मंत्र्यांना मारला. मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा विरोध आणि पेडण्यातील जनतेचे आंदोलन, भावना यांचा विचार करून सरकारने हा आराखडा स्थगित केला आहे, असे ते म्हणाले. आपल्या वडिलांची हजारांनी हेक्टर जमीन आहे. तसेच पेडण्यात आपल्या नावाने एकही इंच जमीन नाही. त्यामुळे या प्लॅनमागे आपला कोणताही स्वार्थ नाही. नगरनियोजन खाते आता यापुढील निर्णय जनतेला विश्वासात घेऊनच करील, असे सांगून त्यांनी हा प्लॅन (मसुदा) अप्रत्यक्षरित्या विश्वासात न घेता झाल्याचे मान्य केले.
‘प्लॅन’ स्थगिती नको, रद्द करा
आमदार जीत आरोलकर यांची मागणी : अन्यथा प्रखर आंदोलन करण्याचा इशारा
नगर नियोजनमंञी विश्वजित राणे यांनी पेडणे तालुक्मयाचा ‘झोनिंग प्लॅन’ स्थगित ठेवण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो पेडणे तालुक्मयातील जनतेला मान्य नाही. हा प्लॅन स्थगित न ठेवत पूर्णपणे रद्द करावा. जोपर्यंत प्लॅन रद्द होत नाही तोपर्यंत आमचा विरोध सुऊच राहणार आहे, अशी आमदार जीत आरोलकर यांनी विर्नोडा येथे घेतलेल्या पञकार परिषदेत आपली भूमिका परत एकदा स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत आरोलकर यांच्याबरोबर मांद्रेचे सरपंच अॅड. अमित सावंत, तुयेच्या सरपंच सुलक्षणा नाईक, आगरवाडा-चोपडे सरपंच सचिन राऊत, मगो मंडळ अध्यक्ष प्रवीण वायंगणकर, मांद्रेचे पंच प्रशांत (बाळा) नाईक, पंच सागर तिळवे, तुयेचे माजी सरपंच किशोर नाईक, पंच सुनीता बुगडे देसाई आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अॅड. अमित सावंत म्हणाले की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विश्वजित राणे यांच्याकडून नगरनियोजन खाते काढून घ्यावे आणि स्वत:कडे ठेवून पेडण्याचा विकास करावा. विश्वजित राणे यांच्यामुळे ‘लिजंड ऑफ गोवन पॉलिक्टिक्स’ असलेले त्यांचे वडिल प्रतापसिंह राणे यांचे नाव खराब होऊ नये, याची काळजी विश्वजित यांनी घ्यावी, असेही ते म्हणाले. यावेळी प्रशांत नाईक, सुलक्षणा नाईक, सचिन राऊत यांनीही आपली मते मांडून झोनिंग प्लॅन पूर्णपणे रद्द करण्याची मागणी केली.









