सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे ठरतात निकामी
मेक्सिकोच्या चिहुआहुआ वाळवंटाला झोन ऑफ सायलेन्स म्हटले जाते. या जागेपासून केवळ 25 मैल अंतरावर नागरी वस्ती आहे, झोन आाrफ सायलेन्समध्ये कुठलेच हॉटेल नाही तसेच या तप्त वाळवंटात कुणी येत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे येथे येणाऱ्या लोकांचा उर्वरित जगाशी संपर्क पूर्णपणे तुटलेला असतो.
चिहुआहुआ वाळवंट जवळपास निर्जन भाग आहे. ये ठिकाण पूर्ण जगात स्वत:च्या अजब वैशिष्ट्यामुळे चर्चेत आहे. या ठिकाणी पोहोचताच सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करणे बंद करू लागतात. वैज्ञानिक आणि संशोधकांच्या दीर्घ प्रयत्नांनंतरही झोन ऑफ सायलेन्समध्ये रेडिओ फ्रीक्वेंसी निरुपयोगी का ठरते याचा शोध लागू शकलेला नाही. याच वैशिष्ट्यामुळे या वाळवंटला झोन ऑफ सायलेन्स म्हटले जाते.
झोन ऑफ सायलेन्सविषयी सर्वप्रथम 1970 मध्ये संशोधन सुरू झाले होते. तेव्हा एक अमेरिकन क्षेपणास्त्र येथे पोहोचताच रहस्यमय पद्धतीने कोसळले होते. या घटनेच्या कारणांचा शोध घेण्यासाठी अमेरिकेच्या वायुदलाचे तज्ञ चिहुआहुआ वाळवंटात पोहोचले होते. पथकाने झोन ऑफ सायलेन्स तपास सुरू ठेवला असता या भागात जीपीएसच नव्हे तर सर्व प्रकारची इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करत नसल्याचे आढळून आले.

चिहुआहुआ एक प्रकारचा डार्क झोन आहे. या क्षेत्रात टीव्ही सिग्नल, रेडिओ सिग्नल, शॉर्ट वेव्ह आणि सॅटेलाइट सिग्नल देखील पोहोचू शकत नाहीत. अमेरिकेच्या तज्ञांच्या पथकाला याचा शोध लागल्यावर त्वरित त्यांनी या ठिकाणाला झोन ऑफ सायलेन्स नाव दिले. तेव्हापासून झोन ऑफ सायलेन्समध्ये अनेक संशोधने अन् अध्ययनं करण्यात आली आहेत. तरीही येथे इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करणे बंद का करतात हे समजू शकलेले नाही.
मेक्सिको सरकारकडून विशाल लॅब
मेक्सिकोच्या सरकारने अमेरिकेच्या पथकाच्या पडताळणीनंतर चिहुआहुआ वाळवंटात एक विशाल लॅब स्थापन केली असून याला ‘द झोन’ नाव देण्यात आले आहे. मेक्सिकोच्या सरकारने चिहुआहुआ वाळवंटातील रहस्यांची उकल करण्यासाठी आणि या ठिकाणावरील वनस्पती तसेच जीवांवर संशोधन करण्यासाठी ही प्रयोगशाळा स्थापन केल्याचे सांगितले आहे. येथे कुठल्याही प्रकारचे सिग्नल नसल्याचा लाभ सरकार घेत असल्याचेही बोलले जाते. या प्रयोगशाळेत एखादे गोपनीय संशोधन सुरू असल्याची चर्चा आहे.
समुद्राचा चिहुआहुआ वाळवंटाशी संबंध
काही संशोधनांनुसार झोन ऑफ सायलेन्समध्ये मॅग्नेटिक गुणधर्म आहेत. याचमुळे येथे पोहोचताच सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करणे बंद करतात. परंतु चिहुआहुआ वाळवंटात मॅग्नेटिक गुणधर्म का आहेत याचा शोध अद्याप घेता आलेला नाही. या ठिकाणी लाखो वर्षांपूर्वी समुद्र होता, या समुद्राला द सी ऑफ थीटिस म्हटले जाते. हे ठिकाण तेव्हा समुद्राचा तळ राहिला असावा असे वैज्ञानिकांचे सांगणे आहे.
स्थानिक लोकांचे दावे
झोन ऑफ सायलेन्समध्ये एखादी पारलौकिक शक्ती किंवा एलियन्सचे वास्तव्य असल्याचे स्थानिक लोकांचे मानणे आहे. त्यांच्यानुसार येथील आकाशात अनेकदा अजब गोष्टी दिसून येत असतात.









