लंडनच्या वेस्टमिंस्टर भागातील गल्ल्यांमधून जाताना एखाद्या भयपटातील दृश्य तुमच्यासमोर उभे राहू शकते. तेथे ‘झॉम्बी’प्रमाणे अर्धवट वाकून वाकडेतिकडे चालणाऱ्या लोकांचा समूह रस्त्यांवर दिसून येऊ शकतो. सध्या लंडनच्या पॉश भागात झॉम्बीप्रमाणे दिसणाऱ्या लोकांमुळे भीती पसरली आहे. वेस्टमिंस्टरच्या रस्त्यांवर कुठेही अस्वच्छ, मळलेले, फाटलेले कपडे, अस्तव्यस्त केस, अर्धवट शुद्धीच्या स्थितीत पडणारे अन् भीतीदायक दिसणारे लोक दिसून येतील. अजबप्रकारे अडखळत चालत कुठल्याही झॉम्बी चित्रपटातील कलाकारासारख्या दिसणाऱ्या लोकांची संख्या लंडनमध्ये वाढत चालली आहे.
या प्रकारामुळे स्थानिक लोक घरातून बाहेर पडण्यास घाबरत आहेत. विक्षिप्त दिसणाऱ्या या लोकांचा समूह कुठल्याही घराच्या दरवाजानजीक दिसून येतो. तर कधी रस्त्याकडेला असलेल्या नाल्यांच्या काठावर बसलेल्या अवस्थेत किंवा झोपलेल्या स्थितीत दिसून येतो.
धोकादायक ड्रग्जचे अॅडिक्ट
झॉम्बीप्रमाणे दिसणारे हे लोक प्रत्यक्षात अमली पदार्थांच्या आहारी गेले आहेत.
क्रॅक, स्पाइस आणि हेरॉइनच्या घातक मिश्रणाच्या नशेत धुंद हे लोक स्वत:च्या झुकलेल्या, झॉम्बीसारख्या वर्तनामुळे स्थानिक लोकांना घाबरवितात. घरांबाहेर उभे राहून हा समूह ड्रग्जचे सेवन करतो. मग बेशुद्ध पडत तेथेच कोसळतात. किंचित शुद्धीवर आल्यावर अजब अन् अस्वच्छ कपड्यांमध्ये सावरत झॉम्बीप्रमाणे चालताना दिसून येतात. लंडनच्या वेस्टमिंस्टरमध्ये मागील वर्षी घरांची सरासरी किंमत 15 लाख पाउंडपेक्षाही अधिक राहिली आहे. या भागांमधील रहिवासी आता अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या लोकांमुळे भीतीत जगत आहेत.
घरांबाहेर करतात गर्दी
हे लोक ड्रग्जचे सेवन करतात, येथेच फिरत राहतात, कधीकधी रस्त्यांवर कोसळतात आणि तेथेच झोपी जातात. बहुतांश लोक पायऱ्यांवर जमा होतात आणि तेथेच झोपी जातात आणि रहिवाशांना त्रास देतात. या ड्रग्ज अॅडिक्ट लोकांमुळे रहिवाशांना रस्त्यांवर किंवा गल्ल्या पार करताना मोठी भीती वाटते असे सुरक्षारक्षकाने सांगितले.
पळवून लावल्यावरही येतात परत
दिवसातून तीन किंवा चारवेळा या लोकांच्या समुहाला पळवून लावले जाते आणि कधीकधी हे लोक निघून जाण्यास नकार देतात, मग पोलिसांना बोलवावे लागते. अशा लोकांना घराबाहेर जमा होण्यापासून रोखण्यासाठी पायऱ्यांवर कुंड्या ठेवल्या जातात, तरीही हे लोक तेथेच बसून खुल्या स्वरुपात ड्रग्ज सेवन करतात आणि मुलांना घाबरवितात, असे सुरक्षारक्षकाने सांगितले आहे. लंडनमध्ये ड्रग्जचा पुरवठा मोठ्या प्रमाणात होत असून किमती खूपच कमी झाल्या आहेत. एका हिटची किंमत 5 पाउंड असू शकते, असे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.
दुकानांमध्ये वाढल्या चोरीच्या घटना
अमली पदार्थांच्या आहारी गेलेले लोक दुकानांमधून चोरी करतात. अमली पदार्थांच्या सेवनानंतर आपण काय करत आहोत याचे भानच त्यांना नसते. रस्त्याच्या कडेला कुठेही ते झोपी जातात. एका ठिकाणी नेहमी 4-5 लोक जमा असतात, हे एकत्र नशा करतात आणि मग तेथेच झोपी जातात. मग समुहात अडखळत चालतात, हे दृश्य पाहून कुणीही घाबरू शकतो, असे अधिकाऱ्याने सांगितले. 2024-25मध्ये लंडनच्या रस्त्यांवर 13 हजार लोक झोपताना दिसून आले होते. हे प्रमाण उच्चांकी ठरले आहे. 15 वर्षांपूर्वीच्या आकड्याच्या तुलनेत हे प्रमाण जवळपास दुप्पट आहे.









