वृत्तसंस्था/ हरारे
यजमान झिंबाब्वेने बांगलादेश विरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत 2-0 अशा फरकाने विजयी आघाडी मिळविली आहे. रविवारी येथे झालेल्या या मालिकेतील दुसऱया सामन्यात सिकंदर रझाच्या नाबाद शतकाच्या जोरावर झिंबाब्वेने बांगलादेशचा 5 गडय़ांनी पराभव केला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकात 9 बाद 290 धावा जमविल्या. त्यानंतर झिंबाब्वेने 47.3 षटकात 5 बाद 291 धावा जमवित विजय नोंदविला. झिंबाब्वेतर्फे सिकंदर रझाने नाबाद शतक (117) आणि रेगिस चेकाबेव्हाने 102 धावा झळकविल्या.
बांगलादेशच्या डावामध्ये कर्णधार तमिम इक्बालने 45 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 50, अनामुल हकने 3 चौकारांसह 20, नजमुल हुसेनने 5 चौकारांसह 38, रहिमने 1 चौकारासह 25, मेहमूदुल्लाने 84 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 80, अतिफ हुसेनने 41 चेंडूत 4 चौकारांसह 41 आणि मेहदी हसनने 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 4 षटकार आणि 29 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे सिकंदर रझाने 3, मध्वेरेने 2, नेयायुची, चिवांगा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युउत्तरादाखल खेळताना झिंबाब्वेच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. त्यांचे पहिले 4 फलंदाज केवळ 49 धावात बाद झाले. त्यानंतर सिकंदर रझा आणि चेकाबेव्हा या जोडीने पाचव्या गडय़ासाठी 201 धावांची भागीदारी करुन आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सिकंदर रझाने 127 चेंडूत 4 षटकार आणि 8 चौकारांसह नाबाद 117, चेकाबेव्हाने 75 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारांसह 102, मुनयोंगाने 16 चेंडूत 2 षटकार आणि 2 चौकारांसह नाबाद 30, मेरुमनिने 42 चेंडूत 3 चौकारांसह 25, केयाने 1 चौकारासह 7 धावा जमविल्या. झिंबाब्वेच्या डावात 8 षटकार आणि 24 चौकार नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे हसन मेहमूद आणि मेहदी हसन मिराज यांनी प्रत्येकी 2 तर टी. इस्लामने 1 गडी बाद केला. गेल्या शुक्रवारी झिंबाब्वेने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 5 गडय़ांनी पराभव केला होता. डेव हॉटनच्या मार्गदर्शनाखाली झिंबाब्वे संघाने अलिकडच्या कालावधीत वनडे आणि टी-20 प्रकारामध्ये 9 सामने जिंकले आहेत.
सक्षिप्त धावफलक
बांगलादेश – 50 षटकात 9 बाद 290 (मेहमूदुल्ला नाबाद 80, तमिम इक्बाल 50, नजमुल हुसेन 38, अतिफ हुसेन 41, रहिम 25, अनामुल हक 20, मिराज 15, सिकंदर रझा 3-56, मध्वेरे 2-40, नेयायुची आणि चिवांगा प्रत्येकी 1 बळी), झिंबाब्वे – 47.3 षटकात 5 बाद 291 (सिकंदर रझा नाबाद 117, चेकाबेव्हा 102, मुनिओंगा नाबाद 30, मेरुमनी 25, हसन मेहमुद 2-47, मेहदी हसन 2-50, टी. इस्लाम 1-48,).









