पत्नीची भावनिक पोस्ट व्हायरल : काही दिवसापूर्वी पसरली होती मृत्यूची अफवा
वृत्तसंस्था/ हरारे (झिम्बाब्वे)
झिम्बाब्वेचा माजी क्रिकेटपटू हीथ स्ट्रीक यांचे रविवारी (3 सप्टेंबर) पहाटे निधन झाले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्याच्या पत्नीने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. काही दिवसांपूर्वी हीथ स्ट्रीकच्या निधनाच्या अफवा पसरल्या होत्या. जगभरातील खेळाडूंनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. पण काही वेळातच त्याचा सहकारी आणि झिम्बाब्वेचा खेळाडू हेन्री ओलोंगा यांनी हीथच्या निधनाचे वृत्त फेटाळले होते. पण आता मात्र खरंच स्ट्रीक या जगातून निघून गेला आहे.
स्ट्रीकच्या पत्नीने फेसबुकवर एक भावनिक पोस्ट लिहिली आणि काही फोटो पोस्ट केले आहेत. तिने लिहिले की, रविवारी पहाटे माझ्या आयुष्यातील प्रेम आणि माझ्या सुंदर मुलांचे वडील आम्हाला सर्वांना सोडून गेले. त्याला आपले शेवटचे दिवस आमच्यासोबत घालवायचे होते. कुटुंबाकडून प्रेम हवे होते. अनंतकाळच्या प्रवासासाठी आपण पुन्हा कधीतरी भेटू.
स्ट्रीकला मे महिन्यात कर्करोगाचे निदान झाले होते. तेव्हाच त्याची प्रकृती अत्यंत वाईट असल्याचे सांगण्यात आले होते. त्याच्यावर प्रथम यूके आणि नंतर दक्षिण आफ्रिकेत उपचार झाले. या आजारानेच त्याचे निधन झाले. या घटनेनंतर जगभरातील अनेक मान्यवरांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
दोन आठवड्यांपूर्वी, स्ट्रीकचा माजी सहकारी ओलोंगाने सोशल मीडियावर त्याच्या मृत्यूची बातमी दिली. मात्र, स्ट्रीक आणि ओलोंगा दोघांनीही नंतर सांगितले की मृत्यूची बातमी खोटी आहे आणि ओलोंगाने त्याच्या मागील पोस्टबद्दल माफी मागितली होती.
12 वर्षांची कारकिर्द
स्ट्रीकने आपल्या 12 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत जवळपास 4 वर्षे झिम्बाब्वे संघाचे कर्णधारपदही सांभाळले. 2000 ते 2004 पर्यंत त्याने कसोटी आणि वनडे अशा दोन्ही प्रकारात झिम्बाब्वे संघाचे नेतृत्व केले. त्याचबरोबर झिम्बाब्वेसाठी कसोटी फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम आजही हिथ स्ट्रीकच्या नावावर आहे. स्ट्रीकने 1993 मध्ये पाकिस्तानविरुद्ध आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती.









