सिन विल्यम्सचे दमदार शतक : छेत्रा, मुझारबनी प्रभावी
वृत्तसंस्था/ बुलावायो
झिंबाब्वेत सुरु असलेल्या आयसीसीच्या 2023 साली भारतात होणाऱ्या विश्व चषक क्रिकेट स्पर्धेपूर्वीच्या पात्रतेच्या सुपर सिक्स फेरीतील सामन्यात यजमान झिंबाब्वेने ओमानचा 14 धावांनी पराभव केला. या विजयामुळे झिंबाब्वेने 6 गुण मिळविले आहेत. झिंबाब्वे संघातील सिन विल्यम्सचे या स्पर्धेतील तिसरे शतक आहे.
या पात्र फेरीच्या स्पर्धेतील हा 21 वा सामना आहे. या सामन्यात ओमानने नाणेफेक जिंकून झिंबाब्वेला प्रथम फलंदाजी दिली. झिंबाब्वेने 50 षटकात 7 बाद 332 धावा जमविल्या. त्यानंतर ओमानने 50 षटकात 9 बाद 318 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 14 धावांनी गमवावा लागला.
या सामन्यात झिंबाब्वेच्या डावात सिन विल्यम्सने 103 चेंडूत 3 षटकार आणि 14 चौकारांसह 142, सिकंदर रझाने 49 चेंडूत 6 चौकारांसह 42, कर्णधार एर्व्हिनने 4 चौकारांसह 25 जोंगवेने 28 चेंडूत 4 चौकारांसह नाबाद 43, मधवेरेने 1 षटकारासह 23, गुंबलेने 2 चौकारांसह 21, ब्युरेलने 1 षटकारासह 13 तर निगरेव्हाने 1 षटकार आणि 1 चौकारासह नाबाद 11 धावा जमविल्या. सिकंदर रझा आणि विल्यम्स यांनी चौथ्या गड्यासाठी 102 धावांची शतकी भागिदारी केली. झिंबाब्वेच्या डावात 6 षटकार आणि 31 चौकार नोंदविले गेले. ओमानतर्पे फयाझ बटने 79 धावात 4 तर बिलाल खान, कलिमुल्ला, मकसुद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना ओमान संघातील सलामीचा फलंदाज काश्यप प्रजापतीने शानदान शतक झळकाविताना 97 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारांसह 103 धावा झळकाविल्या. इलियासने 61 चेंडूत 5 चौकारांसह 45, कर्णधार मकसुदने 1 षटकार आणि 3 चौकारांसह 37, अयान खानने 43 चेंडूत 5 चौकारांसह 47, शोएब खानने 1 चौकारासह 11, नईम खुशीने 1 चौकारासह 12, मोहम्मद नदीमने 18 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 30 तसेच बटने 1 चौकारासह 10 धावा केल्या. ओमानच्या डावात 3 षटकार आणि 32 चौकार नोंदविले गेले. झिंबाब्वेतर्फे छेत्रा आणि मुझारबनी यांनी प्रत्येकी 3 तर निगरेव्हाने 2 तर सिकंदर रझाने 1 गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक – झिंबाब्वे 50 षटकात 7 बाद 332 (विल्यम्स 142, जोंगवे नाबाद 43, सिकंदर रझा 42, गुंबले 21, एर्व्हिन 25, मधवेरे 23, ब्युरेल 13, निगरेव्हा नाबाद 11, अवांतर 6, फयाज बट 4-79, बिलाल खान, कलिमुल्ला, मकसुद प्रत्येकी 1 बळी), ओमान 50 षटकात 9 बाद 318 (काश्यप प्रजापती 103, अकिब ईलियास 45, मकसुद 37, आयान खान 47, शोएब खान 11, खुशी 12, नदीम नाबाद 30, बट 10, अवांतर 20 छेत्रा 3-73, मुझारबनी 3-57, निगरेव्हा 2-60, सिकंदर रझा 1-57).









