रत्नागिरी :
केंद्र सरकार अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून ८० पैकी ६२ विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. शिक्षण विभागाच्या माध्यमातून राबविलेल्या उपक्रमाचे हे यश असल्याचे सिद्ध झाले आहे.
नवोदय विद्यालय प्रवेश निवड विद्यार्थी आलेख परीक्षेसाठी झालेल्या चढता असल्याचे दिसून येते. गतवर्षी ५१ विद्यार्थी निवडले होते. यावर्षी ती संख्या ६२ वर गेलेली आहे. यातील ७८टक्के विद्यार्थी हे जिल्हा परिषदेच्या शाळेतील ग्रामीण भागात शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत. जिल्हा परिषदेने विद्यार्थ्यांची गुणवता वाढ व्हावी यादृष्टीने इस्रो नासा अभ्यास दौरा, प्रज्ञाशोध परीक्षा, नवोदय विद्यालय निवड परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा या स्पर्धा परीक्षांकडे अधिक लक्ष केंद्रित केले होते, त्याचाच परिणाम असल्याचे अनेक अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ, शिक्षकांनी सांगितले .
जि. प. शाळेतील मुलांच्या या यशामध्ये तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पूजार यांनी शिक्षण विभागात राबवलेले उपक्रम सहायभूत ठरले. त्या उपक्रमांमुळे यश मिळाले. वैदेही रानडेंकडून कौतुक जिल्हा परिषदेच्या या यशाबद्दल नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव यांनी सर्व यशस्वी विद्यार्थी, पालक, शिक्षक व अधिकारी यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या आहेत.
- अभिमानास्पद क्षण
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची गोडी लागावी, स्पर्धा परीक्षेचा टक्का वाढावा, स्पर्धा परीक्षेविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण व्हावा यासाठी जिल्हा परिषद शिक्षण विभागाने प्रयत्न केले, त्या प्रयत्नांचा भाग म्हणजे नवोदय परीक्षेतील यश. जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या ६२ विद्यार्थ्यांची निवड होणे, हा अभिमानास्पद क्षण आहे. – बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)








