शोकसभेत राघोजी सावंत यांचे प्रतिपादन
ओटवणे प्रतिनिधी
दाणोली पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाअभावी होणारी गैरसोय लक्षात घेऊन झिला पाटयेकर यांनी कै बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. त्यानंतर दाणोली येथे स्वखर्चाने बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालय सुरू करुन दाणोली परिसरातील विद्यार्थ्यांची माध्यमिक शिक्षणाची गैरसोय दूर केली. त्यामुळे दाणोली पंचक्रोशीसाठी त्यांचे हे योगदान संस्मरणीय राहणार आहे. असे प्रतिपादन माजी पंचायत समिती सदस्य राघोजी सावंत यांनी केले.
कै बाबुराव पाटयेकर शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाबल नाईक उर्फ झिला पाटेकर यांचे नुकतेच निधन झाले. यानिमित्त बाबुराव पाटयेकर माध्यमिक विद्यालयात आयोजित राघोजी सावंत बोलत होते. यावेळी भास्कर परब, संतोष स्वार, सुधाकर सुकी, प्रशांत सुकी, प्रशालेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील, सहाय्यक शिक्षक सखाराम तिळवे, प्रदिप देसाई, राजश्री पाटील, रोहन पाटील, लिपिक भिवा धुरी, कर्मचारी सातेरी पाटील, राजेंद्र बांदेकर, परशुराम लांबर, सागर नेसरकर उपस्थित होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक जयवंत पाटील म्हणाले, काही व्यक्तींचा जन्म हा समाज घडवण्यासाठी आणि समाजातील सर्व गोरगरीब जनतेचा उद्धार करणे करण्यासाठी होतो. हेच ध्येय बाळगून आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घालून शैक्षणिक व कृषी क्षेत्रात क्रांती घडवणारे व्यक्तिमत्व म्हणजे झिला पाटयेकर. त्यांनी आपल्या वडिलांच्या नावे कै बाबुराव पाटेकर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना करून दाणोली येथे त्यांनी दाणोली येथे स्वखर्चाने सुरू केलेले माध्यमिक विद्यालयाचे महान कार्य दाणोलीवासियांच्या कायम स्मरणात राहणार आहे.
यावेळी सखाराम तिळवे यांनी झिला पाटयेकर यांच्या शैक्षणिक कार्याचा आढावा घेताना म्हणाले की त्यांची दूरदृष्टीही वाखण्यासारखी होती. ज्यावेळी पाटये गाव धरणामुळे बुडीत क्षेत्रात आले त्यावेळी त्यांनी झरेबांबर येथे शंभर एकर नापीक जमीन खरेदी करून त्यावर नंदनवन फुलवले आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श घालून दिला. तर प्रदीप देसाई यांनी झिला पाटयेकर यांची शिक्षणाबद्दल असलेली आस्था विद्यार्थ्यांच्या समोर मांडली. यावेळी रोहन पाटील यांनी झिला पाटयेकर यांनी वेळोवेळी पाठीवर दिलेली कौतुकाची थाप व त्यामुळे मिळणारी प्रेरणा याला आता कायमचं मुकावे लागणार अशी खंत व्यक्त केली.
यावेळी भास्कर परब, संतोष स्वार, सुधाकर सुकी, प्रशांत सुकी तसेच उपस्थित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी झिला पाटयेकर यांच्या कार्याबद्दल ऋण व्यक्त करताना त्यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली वाहिली.









