पिता-पुत्राच्या हत्येचा मुख्य आरोपी : 8 दिवसांपासून होता फरार
वृत्तसंस्था/ मुर्शिदाबाद
पश्चिम बंगालच्या हिंसाग्रस्त मुर्शिदाबाद जिल्ह्यात पिता-पुत्राच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी रविवारी दिली आहे. शमशेरगंजच्या जाफराबादमध्ये दोन जणांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
मुख्य आरोपी जाफराबादचे शेजारी गाव सुलिताला पुरबापाराचा रहिवासी असून त्याचे नाव जियाउल शेख आहे. 12 एप्रिल रोजी हत्या करण्यात आल्यावर फरार झाला होता. पश्चिम बंगालच्या एसटीएफ आणि एसआयटीने शेखला उत्तर दिनाजपूर जिल्ह्यातील चोपडा येथील त्याच्या ठिकाणावरून अटक केली आहे.
जियाउल शेखने कट रचत 12 एप्रिल रोजी हरगोविंदो दास आणि त्यांचा पुत्र चंदन दासच्या घरात तोडफोड करत त्यांची हत्या करण्यासाठी जमावाला चिथावणी दिली होती. 12 एप्रिल रोजी जियाउल शेख हा घटनास्थळी उपस्थित असल्याचे सिद्ध करणारे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले असून त्याच्या मोबाइल लोकेशनसंबंधी माहिती देखील हाती लागली आहे.
यापूर्वी पोलिसांनी कालू नादर आणि दिलदार तसेच इंजमाम उल हक या आरोपींना पितापुत्राच्या हत्येप्रकरणी अटक केली होती. कालूला बीरभूम जिल्ह्याघ्च्या मुराराई येथून जेरबंद करण्यात आले, तर त्याचा भाऊ दिलदारला बांगलादेशला लागून असलेल्या सीमेनजीक पकडण्यात आले. तिसऱ्या आरोपीला जाफराबादला लागून असलेल्या सुरीपारा या गावातून ताब्यात घेण्यात आले.
मुर्शिदाबाद हिंसेप्रकरणी 100 हून अधिक गुन्हे नेंद करण्यात आले आहेत, याप्रकरणी आतापर्यंत 276 जणांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. वक्फ अधिनियमात दुरुस्ती झाल्याच्या विरोधात बंगालमध्ये झालेल्या हिंसक निदर्शनांमध्ये कमीतकमी 3 जणांना जीव गमवावा लागला आहे.









