नवी दिल्ली :
जीएसटी 2.0: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) सुधारणांच्या दुसऱ्या टप्प्यात, जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्यांना मोठी सवलत दिली आहे. ही सवलत जीवन विमा आणि आरोग्य विम्यावर शून्य टक्के (0 टक्के) जीएसटीच्या स्वरूपात देण्यात आली आहे. यापूर्वी सरकार आरोग्य आणि जीवन विमा प्रीमियमवर 18 टक्के जीएसटी आकारत होते. सरकारच्या या निर्णयानंतर, पॉलिसीधारकांना नवीन पॉलिसी घेताना नूतनीकरणाच्या वेळी कर भरावा लागणार नाही आणि विमा खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त होईल. बऱ्याच काळापासून या दोन्ही उत्पादनांवरील जीएसटी रद्द करण्याची मागणी होत होती.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी बुधवारी रात्री जीएसटी 2.0 ची घोषणा केली. नवीन जीएसटी रचनेत आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन कर स्लॅब असतील. याशिवाय, लक्झरी आणि इतर काही उत्पादनांसाठी 40 टक्के कर दर असेल. जीएसटीमध्ये 12 टक्के आणि 28 टक्के स्लॅब रद्द करण्यात आला आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जीएसटी कौन्सिलने हा निर्णय एकमताने घेतला आहे.
अर्थमंत्र्यांनी सांगितले की, ‘गेल्या वर्षी संसदेत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की तुम्हाला विमा प्रीमियमवर कर लावायचा आहे का? सविस्तर चर्चा आणि भागधारकांना विश्वासात घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. आता कुटुंब आणि वैयक्तिक विमा घेणाऱ्यांना याचा लाभ मिळेल. आम्ही खात्री करू की कंपन्या हा फायदा विमा घेणाऱ्यांना देतील.’
प्रीमियमवर काय परिणाम?
पॉलिसी बझार डॉट कॉमचे सीबीओ (जनरल इन्शुरन्स) अमित छाब्रा म्हणतात की, जर पॉलिसीधारक सध्या 15,000 (जीएसटीसह) प्रीमियम भरत असेल, तर अलीकडच्या जीएसटी सुधारणांनुसार, त्याचा खर्च 18 टक्केने कमी होईल. याचा अर्थ असा की नवीन प्रीमियम 12,300 असेल, ज्यामुळे थेट 2,700 ची बचत होईल. कमी प्रीमियममुळे अधिक लोकांना पुरेसे कव्हरसह सुरक्षित राहण्यास प्रोत्साहित केले जाईल, तर विद्यमान पॉलिसीधारकांना वार्षिक बचतीचा मोठा फायदा होईल.









