वृत्तसंस्था / मॉस्को
युक्रेन-रशिया युद्ध थांबविण्यासाठी रशियाशी चर्चा करण्यास आपली संमती आहे, असे प्रतिपादन युव्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केले आहे. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी या संदर्भात विचार विमर्श केला आहे. आपण रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी थेट चर्चा करण्यास सज्ज आहोत. आमची इच्छाही हे युद्ध लवकरात लवकर थांबावे, अशीच आहे, असे त्यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. आधी या संदर्भात अमेरिकेला विश्वासात घेतले जाईल. तसेच नंतर युरोपियन महासंघामधील सर्व मित्रराष्ट्रांशी बोलणी केली जातील. त्यानंतर रशियाचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी एकास एक चर्चा केली जाईल, अशी आपली योजना असल्याचे वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.









