वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
गाझा पट्टीत गेली दोन वर्षे चाललेला सशस्त्र संघर्ष रोखण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी जी योजना सुचविलेली आहे, ती अत्यंत प्रभावी आहे, असे प्रतिपादन युव्रेनचे अध्यक्ष वोलोदिभीर झेलेन्स्की यांनी केले आहे. या योजनेमुळे आता युद्धविराम होणे शक्य असून या भागात शांतता निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नुकतीच या संघर्षाला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. हा संघर्ष पुढे चालविणे कोणाच्याही हिताचे नाही, हा मुद्दा ट्रंप यांनी पुढाकार घेऊन इस्रायल आणि हमास या दोघांनाही पटवून दिल्याचे दिसून येत आहे. इस्रायलने गाझा पट्टीवरील सर्व हल्ले थांबविले आहेत. आता हमासला सोमवारपर्यंत सर्व अपहृतांची सुटका करावी लागणार आहे. या बदल्यात इस्रायलही त्याच्या कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या हमासच्या कैद्यांना सोडणार आहे. ही सर्व प्रकिया येत्या 72 तासांमध्ये पूर्ण होणार आहे. अपहृतांची सुटका हमासने निर्धारित कालावधीत केली नाही, तर मात्र युद्धाला पुन्हा प्रारंभ होईल, असा स्पष्ट इशारा इस्रायलने दिला आहे. त्यामुळे आता हमासवर बरेच कही अवलंबून आहे.









